हवेसाठी पैसे लागतात, मग वीज कशी फुकट देणार? शेतकऱ्यांच्या वीज बिलावर ऊर्जामंत्र्यांचे विधान
जालना : राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावर कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही. आम्ही कर्ज घेऊन पैसे भरतो. अलिकडील काळात हवा घ्यायला देखील पैसे लागतात आणि पाणी घ्यायला देखील पैसे लागता. अशा वेळी वीज बिल माफीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगत कोणतेही वीज बिल माफ होणार नसल्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. ते आज जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
राज्यात सुरू असलेल्या सक्तीच्या वीजबील वसुलीचा निषेध व्यक्त करत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आज थेट ऊर्जामंत्र्यांच्या गाडीवर वीज बीले भिरकावली. बदनापुर भाजपा युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी ऊर्जा मंत्री राऊत यांचा ताफा अडवला आणि त्यावर विजेचे बिले फेकली. यावेळी युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वीज माफीची मागणी केली.
याच आंदोलनानंतर एका पत्रकाराने उर्जामंत्री राऊत यांना वीज बिल माफी मिळणार का? राज्य सरकार वीज बिल माफी देवू शकतो का? असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले, विजेची निर्मिती हवेने किंवा पाण्याने होत नाही. अलिकडील काळात हवेसाठीही पैसे मोजावे लागतात आणि पाणी घ्यायलाही पैसे लागतात. अशावेळी वीजबिल माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विजेच्या उत्पादनासाठी कोळसा लागतो. ती वीज ग्राहकांपर्यंत पोहचवायला महामंडळाला मनोरे उभे करावे लागते, स्ट्रीट खांब उभे करावे लागतात. वीज वितरणाला पैसा लागतो. बँकेतून घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर पैसे द्यावे लागतात. महावितरणाने दिलेल्या वीजेचा वापर होतो मग त्याचे पैसे द्यायला नकार का? असाही प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला.



