जनगणनेच्या सर्वेक्षणासाठी शासनाकडून पुरवण्यात आलेले साहित्य खालावलेल्या दर्जाचे..!
राष्ट्रीय जनगणनेच्या कामाला सुरुवात झाली असून राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या पदरी प्रशासकीय अनास्थेमुळे पुन्हा एकदा निराशा आली आहे. जनगणनेच्या सर्वेक्षणासाठी शासनाकडून पुरवण्यात आलेले साहित्य अत्यंत निकृष्ट आणि खालावलेल्या दर्जाचे असल्याने जिल्हाभरातील शिक्षक आणि प्रगणकांमध्ये असंतोष पसरला आहे.
जनगणनेसाठी पायपीट करून गाव- पाड्यांवर जाऊन प्रत्यक्ष विदा (डेटा) संकलित करणाऱ्या शिक्षकांना देण्यात आलेल्या साहित्याबाबत प्रशासनाने कमालीची काटकसर केल्याचे चित्र समोर आले आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविल्याने उन्हात काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
डिजिटल प्रणालीच्या मोठ्या गप्पा मारल्या गेल्या, पण प्रत्यक्षात हातात दिलेले साहित्य मात्र अत्यंत भंगार दर्जाचे आहे. भर उन्हात फिरताना या टोप्या आणि पाठीवरच्या बॅग्स पहिल्या आठवड्यातच फाटलेल्या दिसून येत आहेत.
प्रत्येक राष्ट्रीय कार्यात प्राथमिक शिक्षक अत्यंत प्रामाणिकपणे ग्रामीण आणि दुर्गम भागात काम करत असतो. मात्र, जबाबदारी मोठी द्यायची आणि सुविधा देताना मात्र त्यांची उपेक्षा करायची, ही प्रशासनाची जुनीच पद्धत यावेळी चव्हाट्यावर आली आहे. निकृष्ट साहित्यामुळे शिक्षकांना स्थानिक नागरिकांसमोर मान खाली घालावी लागत असून, यामुळे त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचत आहे.



