जळगाव विधानपरिषद निवडणुकीत अनेक नावे आघाडीवर असतांना नंदकुमार महाजन यांनी बाजी मारली..

जळगाव विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर येथून कुणाला उमेदवारी मिळणार ? याबाबत मोठी चुरस निर्माण झाली होती. यात शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे नाव आघाडीवर होते. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनेक नावे चर्चेत होती. यात प्रामुख्याने नंदकिशोर महाजन, उद्योजक नंदू अडवाणी,अमोल शिंदे, पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र फडके, डॉ. केतकीताई पाटील, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक आदी नावांचा समावेश होता. या सर्व घडामोडींमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार ? याबाबत मोठी उत्सुकता लागली होती. यात नंदकिशोर महाजन यांनी बाजी मारली असून त्यांना भाजपच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे ते उद्या म्हणजेच सोमवार दिनांक एक जून रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



