आपल खान्देशकृषीवार्ता

गिरणा धरणातून सिंचनासाठी तीन आवर्तने सोडा; शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..!

कालवा सल्लागार समितीची तातडीने बैठक घेण्याची मागणी; निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा..

जळगाव |  यंदा पावसाळ्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत गिरणा धरणात १०० टक्के जलसाठा झाला असून सध्या ९७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्यासोबतच शेती सिंचनासाठी कॅनलद्वारे तीन आवर्तने सोडण्यात यावीत, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, गिरणा धरणातून नदीद्वारे पिण्यासाठी पाणी सोडण्याबरोबरच कालव्याद्वारे तीन आवर्तने दिल्यास कालवा क्षेत्रातील सुमारे १५० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. तसेच गुरांच्या पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची समस्या कमी होण्यास मदत होईल.

तीन आवर्तने मिळाल्यास शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ज्वारी, मका, बाजरी यांसारखी पिके घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्यासोबतच शेतीमधील मजुरांनाही रोजगार मिळेल. सध्या आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्या..!

गिरणा धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून कालवा सल्लागार समितीची तातडीने बैठक बोलावण्यात यावी आणि तीन आवर्तने सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, या मागणीवर प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास गिरणा परिसरातील शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून मोर्चा व आंदोलन करावे लागेल. अशा आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी शासनाची राहील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

आता गिरणा धरणातून सिंचनासाठी तीन आवर्तने सोडण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीवर जिल्हा प्रशासन आणि कालवा सल्लागार समिती काय निर्णय घेते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे