राज्य सरकारचा “शिक्षणव्रती पुरस्कार २०२६” हा शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या शिक्षकांना जाहिर..
मुंबई | शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय आणि अमूल्य योगदान देणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांचा सन्मान करणाऱ्या ‘शिक्षणव्रती पुरस्कार २०२६’ ची नामांकने जाहीर करण्यात आली आहेत.
नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, क्रीडा आणि कला क्षेत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणवंतांचा या पुरस्कारासाठी गौरव करण्यात येणार आहे.
यंदाच्या पुरस्कारासाठी शिक्षक, क्रीडा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.
यामध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षक संदीप तानाजी परदेशी यांच्यासह विविध जिल्ह्यांतील मान्यवरांचा समावेश आहे. समाज माध्यमातून त्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.
पुरस्कारासाठी निवड झालेल्यांमध्ये मुंबईचे समीर विजय परब, ठाण्याच्या रोशनी मनीष खेमानी, पालघरचे अमित पास्कल रॉड्रिक्स, शहापूरचे संतोष विशे, कल्याणचे मितेश जैन, कल्याण-डोंबिवली मनपाचे संदीप तानाजी परदेशी, नवी मुंबई मनपाचे प्रा. अमोलकुमार बबूताई महादेव वाघमारे, अंबरनाथचे विलास गायकर, ठाणे मनपाच्या संध्या चौधरी, मुरबाडचे भालचंद्र कुर्ले, भिवंडीचे भगवान पाटील, शहापूरचे सुरेश वरकुटे, ठाण्याचे अर्जुन कुंडलिक चेमटे, मोसिन शेख, सांगलीचे साहित्यिक, प्रकाशक आणि संपादक आनंदा टकले तसेच ठाण्याच्या सोनल ललिता निवृत्ती शेलार यांचा समावेश आहे.
शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्यातून विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या या गुणवंतांचा ‘शिक्षणव्रती पुरस्कार २०२६’ च्या माध्यमातून होणारा सन्मान निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
शिक्षणासाठी झटणाऱ्या या शिक्षणव्रतींच्या कार्याला मानाचा मुजरा!



