महाराष्ट्र टॅलेंट सर्चमध्ये विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; शिंदे इंटरनॅशनल स्कूलतर्फे गुणवंतांचा सन्मान..

पाचोरा | राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण, बुद्धिमत्ता आणि प्रज्ञा शोधण्यासाठी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा (MTSE) मध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने कौतुक करून त्यांना सन्मानचिन्ह देत गौरविण्यात आले.
पाचोरा तालुक्यातील शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देण्यासाठी ‘ग्रामर टॅलेंट सर्च’ परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कौतुक व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यात पहिल्या वर्गातून आरुष अनिल वरदे, दुसऱ्या वर्गातून भव्या नरेश इंगळे, दिव्या इंगळे, तिसऱ्या वर्गातून दिवी प्रतीक जैन, चौथ्या वर्गातून तनय मनोज पाटिल, पाचव्या वर्गातून मोहिनी प्रवीण पाटिल आणि आशिका प्रमोद पाटिल, सहाव्या वर्गातून आलिया पुरसानी, सातव्या वर्गातून मयंक गोपीचंद पाटिल, आठव्या वर्गातून विशाल हडपे, नवव्या वर्गातून अर्थव मराठे हे विध्यार्थी पहिल्या रँक मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांचे फलित असल्याचे प्राचार्य डॉ विजय पाटिल यांनी बोलतांना सांगितले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याला आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

