पाचोरा तालुक्यातील नवलाई माता धरणातील अवैध शेतीपंपांवर अखेर कारवाई..!
पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेसाठी पाटबंधारे विभाग व महावितरणाची संयुक्त मोहीम; समाजसेवक पृथ्वीराज गढरी यांच्या पाठपुराव्याला यश..

पाचोरा तालुक्यातील बदरखे येथील नवलाई माता धरणाच्या जलाशयातून शेतीसाठी होणारा अनधिकृत पाणीउपसा बंद करण्यासाठी सोमवार, दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी पाटबंधारे विभाग आणि महावितरण विभागाच्या संयुक्त पथकाने धरण परिसरात कारवाई केली. या कारवाईत धरण क्षेत्रातील झाडीझुडपांमध्ये लपवून ठेवलेले पाच शेतीपंप आढळून आले. तसेच शेतीपंप न लावता थेट पाणीउपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन अनधिकृत पाइपलाइन खंडित करण्यात आल्या.
नवलाई माता धरणाच्या जलाशयातून सहा ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जात असल्याने या जलसाठ्याचे पिण्याच्या पाण्यासाठी संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, जलाशयातील पाण्याचा शेतीसाठी अनधिकृत वापर होत असल्याची बाब समाजसेवक पृथ्वीराज देवराम गढरी यांनी निदर्शनास आणून दिली होती.
गेल्या आठवड्यात पाटबंधारे विभाग आणि महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी शेतीपंप बंद करण्यासाठी कारवाई सुरू केली होती. मात्र, धरणाचा काही भाग मराठवाड्यात येत असल्याने त्या क्षेत्रातील गावांना पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ही कारवाई अर्धवट थांबवण्यात आली होती. त्यानंतर संबंधित गावांना पूर्वसूचना देऊन सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी पुन्हा संयुक्त कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत पाटबंधारे विभागाचे नगरदेवळा येथील शाखा अभियंता मा. श्री. प्रसाद बापू येवले, कालवा निरीक्षक मा. श्री. बळवंत अशोक पवार, कालवा चौकीदार श्री. नंदलाल गंगाराम पाटील, तसेच श्री. अमोल आबासाहेब वाघ व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला.
महावितरण विभागाच्या वतीने नगरदेवळा येथील उपकार्यकारी अभियंता दीपक बाबरसाहेब, सहाय्यक अभियंता सुनील साळुंखे, तंत्रज्ञ नयन सोनवणे, सोनू राजपूत, तुषार महाले आणि नितीन पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला. यावेळी बदरखे व निपाणे येथील ग्रामसेवक तसेच बदरखे येथील पोलीस पाटील काशिनाथ गढरी उपस्थित होते.संबंधित शेतीपंपांचा पंचनामा करून ते बेलखेडा ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आले.
कारवाईदरम्यान आढळलेल्या पाच शेतीपंपांबाबत पंचनामा करण्यात आला. संबंधित शेतकरी बेलखेडा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर येथील असल्याची माहिती देण्यात आली, याशिवाय शेतीपंप न लावता पाइपलाइनद्वारे पाणी उपसा करणाऱ्या दोन बेवारस अनधिकृत पाइपलाइन खंडित करण्यात आल्या.
धरणातील पाणी हे परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेसाठी महत्त्वाचे असल्याने भविष्यातही पाटबंधारे विभाग आणि महावितरणाने धरण क्षेत्रात वेळोवेळी पाहणी करावी, अनधिकृत पाणीउपसा रोखावा आणि जलाशयातील पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी समाजसेवक पृथ्वीराज गढरी यांनी केली आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वीच प्रशासनाने सतर्क राहून अशा प्रकारच्या अनधिकृत पाणीउपशावर सातत्याने नियंत्रण ठेवावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
#


