आपल खान्देशब्रेकिंग

पाचोरा शहर अंधारात; वादळी पावसानंतर वीजपुरवठा खंडित, नागरिक संतप्त..!

पाचोरा अंधारात; वादळी पावसानंतर वीजपुरवठा खंडित, नागरिक संतप्त

 पाचोरा | प्रतिनिधी

पाचोरा शहरासह तालुक्यात आज सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून अनेक भागांमध्ये तब्बल पाच तासांहून अधिक काळ नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. विशेष म्हणजे, वीजपुरवठा नेमका कधी सुरळीत होणार याबाबत महावितरणकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सायंकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास पाचोरा शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे वीजवाहिन्या आणि विद्युत यंत्रणेला फटका बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी शहरातील विविध भागांसह ग्रामीण भागातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला.

वीज नसल्यामुळे घरगुती कामे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, इंटरनेट सेवा तसेच लहान व्यावसायिकांचे व्यवहार यावर मोठा परिणाम झाला आहे. उकाड्याच्या वातावरणात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर नागरिकांकडून तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडत असून, “वीज कधी येणार?”, “नेमका बिघाड कुठे झाला आहे?”, “महावितरणकडून माहिती का दिली जात नाही?” असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन उचलला जात नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, आपत्कालीन परिस्थितीत महावितरणने त्वरित माहिती देण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. वीजपुरवठा सुरळीत होण्यास विलंब होत असल्यास त्याबाबत वेळोवेळी अधिकृत माहिती देणे हीदेखील महावितरणची जबाबदारी आहे.

 

सध्या नागरिकांचे लक्ष महावितरणच्या पुढील भूमिकेकडे लागले असून, वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याची मागणी जोर धरत आहे.

“पाचोरा अंधारात, पण महावितरण मौनात; नागरिकांचा संताप वाढला!” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे