स्वराज्य करिअर अकॅडमीतर्फे पोलीस दलात निवड झालेल्या यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव..

स्वराज्य करिअर अकॅडमीतर्फे पोलीस दलात निवड झालेल्या यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव
पाचोरा, प्रतिनिधी आरडी फाउंडेशन संचलित स्वराज्य करिअर अकॅडमी, पाचोरा यांच्या वतीने यंदा विविध पोलीस दलांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. दिनांक 30 मे रोजी आयोजित या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि यशाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पीएसआय गणगे साहेब होते. यावेळी एएसआय मोरे साहेब तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. चिंचोले सर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पीएसआय गणगे साहेब यांनी नव्याने पोलीस दलात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत पोलीस सेवेमधील कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि जनतेप्रती असलेल्या सेवाभावाबाबत मार्गदर्शन केले. तर प्रा. चिंचोले सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, अभ्यास नियोजन आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांविषयी सखोल मार्गदर्शन केले.
या समारंभात देवेन संजय पाटील, राजश्री दिगंबर पाटील आणि पूजा बापू पाटील यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल, तसेच माजी सैनिक वीरेंद्र दिनकर पाटील यांची एसआरपीएफमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी अकॅडमीचे प्रमुख प्रा. स्वप्नील मराठे सर यांनी बोलताना सांगितले की, “स्वराज्य करिअर अकॅडमीचा यशाचा आलेख दरवर्षी उंचावत असून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील राहील.”
कार्यक्रमाच्या शेवटी मैदानी प्रशिक्षक शुभम गायकवाड सर यांनी उपस्थित मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. स्वराज्य करिअर अकॅडमीच्या या यशस्वी विद्यार्थ्यांनी परिसरातील तरुणांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असून त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


