पाचोरा-भडगावच्या वीज प्रश्नांवर उद्या निर्णायक बैठक!
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत प्रशासन, महावितरण आणि नागरिक आमनेसामने

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सोमवार, दि. १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील व्यापारी भवन येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मतदारसंघात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाची समस्या, कृषी व घरगुती ग्राहकांच्या तक्रारी, स्मार्ट मीटरसंदर्भातील अडचणी तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य वीज समस्यांवर सविस्तर चर्चा करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत प्रांताधिकारी भूषण अहिरे, पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे, भडगाव तहसीलदार शीतल सोलाट, पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, भडगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती मालगावे, पाचोरा कृषी अधिकारी सुधाकर कराड, भडगाव कृषी अधिकारी दीपक ठाकूर, गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, भडगाव गटविकास अधिकारी के. बी. अंजने यांच्यासह महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय पाचोरा-भडगाव मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध तक्रारदार नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
मतदारसंघातील वीजविषयक प्रश्नांचा सर्वंकष आढावा घेऊन त्यावर तातडीने निर्णय व्हावा, विविध विभागांमध्ये समन्वय निर्माण व्हावा आणि प्रलंबित तक्रारींचे जलद निवारण व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस नागरिकांनी आपल्या समस्या, सूचना व तक्रारींसह उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वतीने स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांनी केले आहे.


