रामेश्वर तांड्याच्या गावठाणाच्या मागणीला पुन्हा जोर; निर्णय न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा..!
यासाठी अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला असून, शासनाकडे अनेक निवेदने आणि तक्रारी सादर केल्याचा दावा करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील रामेश्वर तांड्याच्या गावठाणाच्या प्रश्नाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. गट क्रमांक ६९/अ ही शासकीय जमीन गावठाणासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करत ग्रामस्थांनी प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे. योग्य निर्णय न झाल्यास ३ ऑगस्ट रोजी जळगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
सविस्तर बातमी वृत्त असे की, रामेश्वर तांडा (ता. पाचोरा) येथील गट क्रमांक ६९/अ ही शासकीय जमीन ‘संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजना’ अंतर्गत गावठाण म्हणून तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे.
गोर सेना आणि रामेश्वर तांडा येथील ग्रामस्थांनी यासाठी अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला असून, शासनाकडे अनेक निवेदने आणि तक्रारी सादर केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
यासोबतच ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक नियमित कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचा आरोपही करण्यात आला असून, त्यामुळे अनेक प्रशासकीय कामे रखडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कथित बनावट अर्ज प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून सत्य समोर आणावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार, गट क्रमांक ६९/अ संदर्भात यापूर्वी शासन आदेश, तहसीलदारांचे पत्र, ग्रामसभा ठराव तसेच विविध शासकीय पत्रव्यवहार झालेले असतानाही प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास ३ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव येथे कायद्याच्या चौकटीत राहून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न मार्गी लागतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


