पाचोरा–भडगाव मतदारसंघाला त्या कार्यालयाशी जोडणे म्हणजे येथील नागरिकांवर अन्याय

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा–भडगाव हे तालुके प्रस्तावित चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्याच्या हालचाली सुरु झाल्या असताना, त्यास आमदार किशोर पाटील यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. हा निर्णय कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही. प्रसंगी त्यासाठी मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
चाळीसगाव शहराला अपर जिल्हाधिकारी कार्यालय देण्यास त्यांचा कोणताही विरोध नाही. मात्र पाचोरा–भडगाव मतदारसंघाला त्या कार्यालयाशी जोडणे म्हणजे येथील नागरिकांवर अन्याय करणारा निर्णय ठरेल. जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, जिल्हा सत्र न्यायालय, कृषी विभाग, समाजकल्याण विभाग यांसह विविध महत्त्वाची शासकीय कार्यालये असल्याने नागरिकांची अनेक कामे एकाच ठिकाणी पूर्ण होतात. मात्र, चाळीसगावला जोडल्यास या मतदारसंघातील नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि वकील यांना अनावश्यक प्रवास, अतिरिक्त आर्थिक भार आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागेल, असे आमदार पाटील म्हणाले.
पाचोरा–भडगाव तालुके प्रस्तावित चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्याच्या विषयावर यापूर्वी विभागीय आयुक्त, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी सदरचा प्रस्ताव अयोग्य असल्याचे मान्य करून तो मागेही घेण्यात आल्याची माहिती मिळाली होती. मात्र, पुन्हा हा प्रस्ताव पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याने संपूर्ण मतदारसंघात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले. या निर्णयाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त तसेच जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सामूहिक निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविली जाईल. आवश्यकता भासल्यास जनआंदोलन, रस्ता रोको आणि जेलभरो आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल. माझी आमदारकी पणाला लागली तरी चालेल; मात्र मतदारसंघावर अन्याय होऊ देणार नाही, असेही विधान आमदार पाटील यांनी केले.


