बातमी मागची बातमी..! नाशिक भाजपला, तर जळगाव शिवसेनेला जाणार ?
“जळगाव कोणाच्या वाट्याला?” या प्रश्नाकडे आता संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

जळगाव : जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाचा तिढा अधिकच वाढताना दिसत आहे. विशेषतः जळगाव आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या जागांवरून भाजप आणि शिवसेना आमनेसामने आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या दिल्ली बैठकीनंतरही जागावाटपाचा अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जळगावच्या जागेवर भाजपकडून जोरदार दावा केला जात असताना, शिवसेनेकडूनही ही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला जात असल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये भाजपची ताकद आणि स्थानिक समीकरणे पाहता ती जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच बदल्यात जळगावची जागा शिवसेनेला मिळू शकते, अशी राजकीय चर्चा आता वेगाने पुढे येत आहे.
जळगावातील इच्छुक उमेदवारांनी लॉबिंगला वेग दिला असून, मुंबईपासून दिल्लीपर्यंत बैठका आणि संपर्क मोहिमा सुरू आहेत. आगामी दोन दिवसांत महायुतीचा अंतिम फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता असून, त्यानंतरच जळगावच्या राजकारणातील चित्र स्पष्ट होणार आहे.


