आपल खान्देशब्रेकिंग

धुळ्यात भोंदूगिरीचे भयावह वास्तव उघड; अल्पवयीन मुलीवरील अत्याचारासह अघोरी विधींचा पर्दाफाश

 

धुळे जिल्ह्यातील देवपूर आणि साक्री तालुक्यात उघड झालेल्या दोन धक्कादायक घटनांनी अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि सामाजिक असुरक्षिततेचे गंभीर चित्र समोर आणले आहे. एका बाजूला देवपूरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित भोंदू भगत कृष्णा चित्ते याने अत्याचार करून तिचे फोटो काढत ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे, तर दुसरीकडे जैताणे परिसरातील भोंदू योगेश खैरनारच्या कथित अघोरी आश्रमात धक्कादायक साहित्य आढळून आले आहे.

देवपूरातील प्रकरणात पोलिसांनी आरोपी भगत कृष्णा चित्तेचा मोबाइल जप्त करून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. पीडित मुलीचे फोटो तसेच इतर महत्त्वाचा डेटा आरोपीने डिलीट केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे तज्ज्ञांकडून हा डेटा पुन्हा प्राप्त करण्याचे काम सुरू आहे. मोबाइलमधील माहिती समोर आल्यानंतर अत्याचाराची नेमकी वेळ, फोटो इतरांना पाठवले गेले का, यासह अनेक प्रश्नांची उत्तरे स्पष्ट होणार आहेत.

तक्रारीनुसार, मुलीच्या असहायतेचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर त्याच्या संपर्कातील एका अल्पवयीन मुलानेही पीडितेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सध्या पीडित मुलगी रुग्णालयात उपचार घेत असून पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

दरम्यान, साक्री तालुक्यातील निजामपूर-जैताणे परिसरात दुहेरी हत्याकांडानंतर चर्चेत आलेल्या भोंदू योगेश खैरनारच्या कथित आश्रम परिसरात अघोरी विधींसाठी वापरले जाणारे साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. आश्रमालगतच्या टेकडीवर गुरांची हाडे, शिंगे, लांब केस, काळ्या बाहुल्या, अत्तराच्या बाटल्या, बांगड्या, टिकल्या, कवड्या, पावडरचे डबे, आरसे, लिंबूंमध्ये टोचलेल्या सूया आणि अंगारे विखुरलेल्या अवस्थेत दिसून आले.

स्थानिकांच्या माहितीनुसार, भोंदू योगेश खैरनार हा “भूत उतरवणे”, “तंत्र साधना” आणि “दोष निवारण” अशा नावाखाली पूजा विधी करत होता. विशेषतः अमावस्या आणि पौर्णिमेला येथे मोठी गर्दी होत असे. या अघोरी विधींचे व्हिडिओ आणि रिल्स सोशल मीडियावर व्हायरल करून त्याने स्वतःभोवती तथाकथित तंत्रशक्ती साधकांचा दरबार उभा केला होता.

आश्रम परिसरातील भौगोलिक रचना आणि जंगलभागाचा वापर करून आरोपीने गुन्हे लपवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या भागात वन्य प्राण्यांचे प्रमाण अधिक असून मृतदेह नष्ट करण्यासाठी त्याचा वापर केला गेला असावा.

निजामपूर परिसरात अजूनही पाच भोंदू सक्रिय असल्याचा दावा स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. “साक्षात्कार” आणि “दैवी शक्ती”च्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे अंधश्रद्धेच्या आड सुरू असलेल्या गैरप्रकारांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून समाजात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे