आपल खान्देश

समाज सुधारणेकडे एक पाऊल; एका आदर्श विवाहाची सर्वत्र चर्चा..

कुसुंबा, आजच्या काळात लग्नसमारंभ म्हटलं की मोठा खर्च, दिखाऊपणा, प्री-वेडिंग शूट, महागड्या भेटवस्तू आणि बडेजाव हे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र या सर्व प्रवाहाला छेद देत धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथे पार पडलेल्या एका विवाह सोहळ्याने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

दि. १० मे २०२६ रोजी कुसुंबा येथे सदानंद परदेशी यांच्या पुतणीचा विवाह धार्मिक चालीरीतीनुसार अत्यंत साधेपणाने व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. मोठे बंधू व पुतण्याच्या अकाली निधनानंतर पुतणीच्या लग्नाची जबाबदारी सदानंद परदेशी यांनी समर्थपणे पार पाडली.

या विवाहात दोन विशेष बाबींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.पहिली म्हणजे लग्नात उपस्थित मान्यवर व नातेवाईकांना महागडे कपडे किंवा वस्तू भेट न देता शाल व टोपी देऊन सन्मान करण्यात आला. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या विवाहात कोणत्याही प्रकारची आर्थिक लग्न देणगी स्वीकारण्यात आली नाही.

या दोन धाडसी आणि अनुकरणीय निर्णयांमुळे हा विवाह सर्वसामान्य विवाह न ठरता समाजासाठी आदर्श ठरला आहे. समाजामध्ये वाढत चाललेला अवाजवी खर्च, दिखाऊपणा आणि स्पर्धात्मक मानसिकता यामध्ये सदानंद परदेशी यांनी दिलेला हा संदेश समाजासाठी प्रेरणादायी मानला जात आहे.

सदानंद परदेशी यांच्या या कार्यात त्यांच्या धर्मपत्नी, मुले, भाचे, जावई तसेच सर्व कुटुंबीय आणि नातेवाईकांनीही मोलाची साथ दिली. त्यामुळे या संपूर्ण कुटुंबाचे समाजातून कौतुक होत आहे.

सध्या विवाहसोहळ्यांमध्ये प्री-वेडिंग शूट, दारू पार्ट्या, हळदीतील अवाजवी खर्च, मोठ्या भेटवस्तू आणि दिखाऊपणाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यामुळे समाजातील गरीब कुटुंबांवर नकळत आर्थिक दबाव निर्माण होत असून नैतिक मूल्यांवरही परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर सदानंद परदेशी यांनी साधेपणा, सामाजिक भान आणि संस्कार जपत केलेली कृती समाज सुधारणेकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे समाजातील विविध स्तरांतून स्वागत होत असून इतरांनीही अशा आदर्श कृतींचे अनुकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे