‘महाराष्ट्र संकटात असताना अमृता फडणवीसांना शेरोशायरी सुचते, सत्तेची लालसा अजूनही दिसून येते’
मुंबई | राज्यावर एकीकडे कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे तौक्ते चक्रीवादळाचे संकट ओढावले आहे. अशा स्थितीत अमृता फडणवीस यांनी काल (१७ मे) शेरोशायरी करत सरकारला सुनावले होते. त्यांच्या या ट्विटचा राष्ट्रवादीने समाचार घेतला आहे. अमृता फडणवीस यांनी संवेदनशीलपणा दाखवण्याऐवजी राजकीय शेरोशायरी करतात. यामधून त्यांना असणारी सत्तेची लालसा दिसून येते. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीने संकटकाळात अशाप्रकारे वागणे योग्य नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली.
उमेश पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधताना अमृता फडणवीस यांना सुनावले आहे. आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या सौभाग्यवतींना मुख्यमंत्रीपद गेल्यावर जेवढं दुःख झालं नसेल तेवढं दुःख या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींना झाले आहे. त्यामुळे त्या अस्वस्थतेतून शेरोशायरी करतात. अशा कठीण प्रसंगात सरकारवर संकट येईल अशी शेरोशायरी करण योग्य नाही, यावरून त्यांची सत्तेची लालसा दिसून येते. हे वर्तन माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीला न शोभणारे असल्याचे उमेश पाटील यांनी म्हटले आहे.
काय होतं अमृता फडणवीस यांचं ट्विट?
मुंबईत काल तौक्ते चक्रीवादळाचे थैमान सुरु असताना अमृता फडणवीस यांनी ट्विट केले होते. ‘तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है ,देखें अबके किसका नंबर आता है !’, असा मजकूर या ट्विटमध्ये आहे. आता अमृता फडणवीस यांना या माध्यमातून आणखी एका राजकीय वादळाविषयी सूचित करायेच आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. या राजकीय वादळाचा फटका कोणाला बसणार, महाराष्ट्रातील राजकारणावर त्याचे काय परिणाम होणार, असे काही प्रश्न अमृता फडणवीस यांच्या ट्विटमुळे उपस्थित झाले होते.



