कुटुंबांच्या अंतर्गत होणाऱ्या मुलींच्या शोषणा विरूध्द कुटुंब व सामाजिक स्तरावर जागृती होणे गरजेचे – मा.ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे
पुणे, ता.२१ : बदलापूर येथे एका शाळेत घडलेल्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर शासनाने शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांसाठी महाराष्ट्रातील विविध शाळांना निर्देश दिले. त्यातील एक भाग म्हणून शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या संदर्भात शाळा व्यवस्थापनावर जबाबदारी निश्चित करण्यात आली.
बऱ्याचदा मुलींना लैंगिक अत्याचाराच्या घटनेची कुठेही वाच्यता करायची नाही अशी धमकी गुन्हेगाराकडून केली जाते.अशा वेळेस शालेय स्तरावरील तक्रारपेटी, समुपदेशन या माध्यमातून आता अनेक घटना उघडकीस येताना दिसून येत आहेत.
पुण्यात शाळकरी मुलीला गुंगीचे इंजेक्शन देऊन तिच्यावर जवळच्या एका नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली .शाळेतील तक्रारपेटीत मुलीने ती घटना एका अर्जात लिहिल्यानंतर सदर घटना उघडकीस आली. आरोपीने कोणाला काही सांगितले तर त्यासंदर्भातील फोटो सर्वत्र पसरवून बदनामी करेन अशी धमकी दिली. कुटुंबातील व्यक्तीनेच मुलींचे शोषण केल्यास मुलींच्या पुनर्वसनाचा प्रश्न उभा राहतो. कुटुंब व समाज स्तरावर जागृती होऊन संवेदनशीलता निर्माण होणे गरजेचे आहे.शालेय स्तरावरील मुलींच्या सुरक्षेसाठी अजून काही ठोस उपाययोजना करता येतील का ? यावर शासनाच्या गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग यांच्याशी बैठक करणार असल्याचे मा. ना. डॉ. नीलमताई गोऱ्हे म्हणाल्या आहेत.



