तुमच्या राज्यात मला जगण्याची इच्छा नाही : अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजेवक अण्णा हजारे यांनी वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
झूम मराठी वृत्तसेवा
अहमदनगर : राज्यातील सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात अण्णा हजारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही सरकारला दिला. त्यानंतर सरकारच्या वतीने अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू असून राज्य उत्पादन शुल्क च्या सचिव वंदना कृष्णा यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. या सचिवांकडून अण्णा हजारे यांना लेखी पत्र देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने हा कायदा राबवणे आणि जनतेतून हरकती मागवल्या जातील असं आश्वासन दिले आहे. यावर मी 50% समाधानी असल्याचं मत अण्णांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर आज अण्णा हजारे यांनी ग्रामसभेत भाषण करताना राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
अण्णा हजारे यांनी म्हटलं, तुम्ही वाईन का आणता… आणि अशा प्रकारे खुल्या बाजारात तुम्ही विक्री करायला ठेवताय. म्हणून मला तुमच्या राज्यात जगायचं नाहीये. हा प्रश्न राळेगणचा नाहिये तर राज्याचा आहे. अरे वाईन की काय आपली संस्कृती आहे का? आयुष्य बरबाद करायला निघालेत. म्हणून जगायची इच्छा होत नाही. झाले 84 वर्षे खूप झाले. अशा प्रकारचा निर्णय सरकार घेत आहे.
काल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सचिव आल्या होत्या भेटायला. मी त्यांना सांगितलं, तुम्हाला हा निर्णय घ्यायचाच होता तुम्हाला तर तुम्ही आधी जनतेचं मत विचारात घ्यायला हवं होतं. त्यांनी सांगितलं, तुमच्या मताप्रमाणे आम्ही वाईन विक्रीचा जो काही निर्णय जनतेला विचारल्याशिवाय घेणार नाही. मी त्यांना सांगितलं, मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय जनतेसमोर ठेवा आणि जनतेने जर परवानगी दिली तर तुम्ही विचार करा, नाहीतर नाही. रद्द करा. लोकशाहीत जनता प्रमुख आहे.




