महाराष्ट्र

‘रात्रीस खेळ चाले’चा प्रयोग : मोदी उत्तरप्रदेशात जाहीर सभा घेतात आणि दिल्लीत येऊन कोरोनाबद्दल चिंता व्यक्त करतात; शिवसेनेचे टीकास्त्र

पंतप्रधान मोदी हे उत्तरप्रदेशात जाहीर सभा घेतात व दिल्लीत येऊन कोरोना, ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत आरोग्य खात्याच्या बैठका घेऊन चिंता व्यक्त करतात, असा टोला शिवसेनेने सामनातून टोला लगावला

मुंबई : देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. राज्य सरकारने ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काही नवे निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निवडणूक प्रचारसभांच्या मुद्द्यावरून शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून हल्लाबोल केला.

देशातील ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक घेतली असली तरी, त्याआधीच २१ डिसेंबर रोजी सर्व राज्यांना केंद्राकडून ओमिक्रॉनसंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांच्या आधारे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, ओडिशा या राज्यांमध्ये रात्रीच्या संचारबंदीसारखे निर्बंध लागू करण्यात आले. त्यापाठोपाठ आजपासून राज्यामध्येही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही हे निर्बंध कितपत योग्य आहेत असा प्रश्न केंद्राच्या सल्ल्याने निर्बंध लागू करणाऱ्या ठाकरे सरकारने सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे

कोरोनाचा संसर्ग काहीसा ओसरू लागल्यावर सरकारने निर्बंध हटविले. लोक गाडी-घोडे, रेस्टॉरंट, मॉल्स, नाटक-चित्रपटगृहांत फिरू लागले. लोकल ट्रेन्सच्या दारात नेहमीप्रमाणे प्रवासी लटकू लागले. विमानतळांवर जत्रा भरल्या. देशभरातील ‘खाऊगल्ल्या’ फुल्ल झाल्या. लग्न, समारंभ, पार्ट्या ओसंडून वाहू लागल्या व त्याहीपेक्षा ज्या चार-पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत तेथे आपले पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या गर्दीच्या सभा होत आहेत. त्या गर्दीत कोरोनाचे कोणतेही नियम किंवा निर्बंध पाळले जात नाहीत, असा घणाघात शिवसेनेने केला

उत्तरप्रदेशात अखिलेश यादव, प्रियंका गांधी यांच्या सभांना आणि रोड शोंना मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण शेवटी कोरोनाचे नियम पाळायलाच हवेत. अर्थात  मोदी हेच वाराणसीपासून लखनौपर्यंत जाहीर सभा घेत आहेत. नियमांचे पालन सगळ्यात आधी पंतप्रधानांनी केले पाहिजे. पंतप्रधान मोदी हे उत्तरप्रदेशात जाहीर सभा घेतात व दिल्लीत येऊन कोरोना, ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत आरोग्य खात्याच्या बैठका घेऊन चिंता व्यक्त करतात, असा टोला शिवसेनेने मोदींना लगावला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे