दोंडाईचा येथे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्यासह विविध स्मारकांचे लोकार्पण.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्यासह विविध स्मारकांचे करण्यात आले लोकार्पण.
दिलीप जय परदेशी
दोंडाईचा : देशात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून देशाची विकासाकडे घोडदौड सुरू असून आपला देश दिवसेंदिवस प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. आज आपली ३ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था झाली असून पुढील तीन-चार वर्षांत ५ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था झाल्यावर जगात टॉप-३ देशांमध्ये आपले नाव येणार असून देश स्वतंत्र झाल्यापासून दहवादाचा सामना करीत आहे; पंरतु येत्या काळात देशातून दहशतवाद संपविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. देशाचे पहिले सी.डी.एस. बिपीन रावत यांच्या नावाने रस्त्याचे नामकरण करणारी दोंडाईचा ही देशातील पहिली नगरपालिका ठरली असल्याचे गौरवोद्गारदेखील संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज दोंडाईचा येथे काढले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज दोंडाईचा शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, महारणा प्रतापसिंह स्मारक, शहीद अब्दुल हमीद स्मारक, श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल स्मारक, सी.डी.एस.जनरल बिपीन रावत मार्ग नामकरण, तसेच दोंडाईचा शहराचा मुख्य रस्ता असलेल्या राजपथाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकासरत्न सरकारसाहेब रावल होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ.सुभाष भामरे, माजी मंत्री आ.जयकुमार रावल, नगराध्यक्ष नयनकुंवरताई रावल, मुख्याधिकारी प्रवीण निकम, धुळ्याचे महापौर प्रदीप कर्पे, जि.प.चे अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्ष कुसुम निकम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, कामराज निकम, शहराध्यक्ष प्रवीण महाजन, बांधकाम सभापती निखील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


