यशवंतराव होळकर जयंती उत्सव वाफगांव येथे साजरा केला जाणार आहे, उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन
यशवंतराव होळकरांचा लढा बेशिस्त मोगल सैन्यांशी नव्हता. सारा भारत गिळंकृत करण्याचे स्वप्न बाळगणा-या इंग्रजांच्या शिस्तबद्ध व आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी होता. इंग्रजांचे कपट व्यूह आणि रणमैदानांवरील रणनितीला तोंड देणे भारतातील एकाही संस्थानिकाला अथवा सरदाराला शक्य झाले नाही. भोसले-शिंदेंसारखे बलाढ्य सरदार अवघ्या दोन दिवसाच्या युद्धात पराजित झाले व इंग्रजांचे मांडलिक बनले. तीच गत शीख, रजपुत व जाट राजांची….पण एकमेव असा महावीर यशवंतराव होलकर भारतभुमीने जन्माला घातला होता ज्याने इंग्रजांना सा-या देशाचा शत्रू मानत इंग्रजांशी लढा पुकारला. एक-दोन नव्हे तब्बल अठरा युद्धांत त्यांना पराजित केले. वाटर्लूपेक्षा खडतर असे भरतपूरचे युद्ध व अलौकिक अशा रणनीतीचे उदाहरण बनून बसलेले मुकुंद-याचे युद्ध आज जागतीक युद्धेतिहासात अजरामर झाले आहे.

पहिल्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा एल्गार पुकारणा-या या महायोद्ध्याचा जन्म ३ डिसेंबर १७७६ रोजी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरजवळ असलेल्या वाफगांव येथील होलकरांच्या भूईकोट किल्ल्यात झाला.
येत्या तीन डिसेंबरला त्यांचा जयंती उत्सव वाफगांव येथे साजरा केला जाणार आहे. सर्व इतिहासप्रेमी, स्वतंत्रता प्रेमी व अलौकिक साहसांवर प्रेम करणा-या सर्वांना या उत्सवात सहभागी होण्याचे विनम्र आवाहन!




