Pachora | वानेगावाच्या शिवारात वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या मका पिकाला आग लागून मोठे नुकसान!
घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे

पाचोरा | पाचोरा तालुक्यातील वानेगाव येथे घडली असून, शेतामधून गेलेल्या वीज वाहिन्यांच्या निष्काळजी देखभालीमुळे ही आग लागल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. वीज तारा सैल झाल्याने आणि स्पार्किंगमुळे शेतातील उभा मका पिकाला अचानक आग लागली. काही मिनिटांतच आगीने भीषण रूप धारण करत संपूर्ण पीक जळून खाक झाले.
तालुक्यातील वानेगाव शेत शिवारात आज दुपारच्या सुमारास घडलेल्या घटनेत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. गट क्रमांक १३६ मधील शेतकरी रविंद्र प्रल्हाद पाटील यांच्या शेतातील सुमारे १ ते १.५ एकर क्षेत्रातील मका पिक जळून खाक झाले असून घटनास्थळी उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले की, “आम्ही अनेक वेळा वीज कंपनीकडे तक्रार केली होती, मात्र कोणतीही दखल घेतली नाही. अखेर आज आमचं संपूर्ण पीक जळून गेले.”
या शेत शिवारात शेतात वीज तारा सैल झाल्याने आणि स्पार्किंगमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे, संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधित विभागाकडून व तलाठी अद्याप पंचनामा करण्यात आलेला नसून, शेतकरी रविंद्र पाटील यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात येत आहे.



