पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणे यांचा जिल्हा युवा पुरस्काराने सन्मान..
महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने त्यांचा गौरव करण्यात आला.

- दिलीप परदेशी
जळगाव | महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी समाजातील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा हा मान पाचोरा येथील कमलेश सोनवणे यांनी आपल्या कार्यातून मिळवला आहे.
जळगाव येथील पोलिस परेड मैदानावर आयोजित कार्यक्रमात मा. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कमलेश यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिश्मा नायर, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
- कमलेश सोनवणे यांचा कार्याचा आढावा
कमलेश सोनवणे हे शिक्षण, आरोग्य, लिंगसमानता, क्रीडा आणि पर्यावरण या विविध क्षेत्रांत सक्रियपणे कार्यरत असून एक प्रभावी व्याख्याता म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी नवी दिल्लीतील विज्ञान भवन आणि भारत मंडप येथे दिलेल्या व्याख्यानांमुळे जळगाव जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. सध्या ते स्वतःची सामाजिक संस्था चालवत असून केंद्रीय युवा मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत’ या उपक्रमात सक्रिय स्वयंसेवक म्हणूनही योगदान देत आहेत.
हा पुरस्कार मिळाल्याने प्रेरणा वाढली असून, भविष्यात अधिक जोमाने काम करत जिल्ह्यातील तरुणांसाठी मोठ्या संधी निर्माण करण्याचा निर्धार कमलेश यांनी व्यक्त केला आहे.
या यशाबद्दल जिल्हा युवा अधिकारी श्री. अभिषेक चवरे, उपजिल्हाधिकारी श्री. भूषण अहिरे, तहसीलदार श्री. विजय बनसोडे, तसेच के.सी.ई. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. नंदकुमार बेंडाळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक करत शुभेच्छांचा वर्षाव केला.
सामाजिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांनी कमलेश सोनवणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९६०८४२३६९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल तसेच इंस्टाग्रामवर @kamlesh4 इंडिया वरही कनेक्ट होता येईल.


