पाचोऱ्यात मेहनती बापाची लेक ठरली शाळेची मानकरी…
रोजंदारी करणाऱ्या वडिलांच्या मुलीने दहावीत मिळवला शाळेत प्रथम क्रमांक

- दिलीप परदेशी
पाचोरा (प्रतिनिधी) गरीबी, कष्ट आणि संघर्ष यांना जिद्दीच्या जोरावर मागे टाकत कनिष्का सौरभ जैन या मेहनती विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत जय किरण प्रभाजी संचालित न्यु इंग्लिश शाळेतून प्रथम क्रमांक मिळवत आपल्या आई-वडिलांसह संपूर्ण शहराचे नाव उज्वल केले आहे. विशेष म्हणजे तिचे वडील सौरभ जैन हे पाचोऱ्यात रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, मात्र मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी कधीही मेहनतीची कमी पडू दिली नाही.
अत्यंत साध्या परिस्थितीत राहूनही या विद्यार्थिनीने अभ्यासात सातत्य ठेवत मोठे यश संपादन केले. आर्थिक अडचणी, मर्यादित साधने आणि अनेक संकटांवर मात करत तिने हे यश मिळवले आहे. तिच्या या यशामुळे गावात आणि शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“माझ्या वडिलांचे कष्ट आणि आईचे पाठबळ यामुळेच हे शक्य झाले,” अशी भावना विद्यार्थिनीने व्यक्त केली. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न असल्याचेही तिने सांगितले.
शाळेचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थिनीचे अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मेहनती बापाच्या संघर्षाला मुलीच्या यशाने मिळालेली ही सोन्याची किनार अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जय किरण प्रभाजी संचालित न्यु इंग्लिश शाळेतील निकाल 100% लागल्याची परपंरा आहे.



