“भाजपाच्या ड्रग्ज कनेक्शनचा पर्दाफाश”, अतुल लोंढे यांनी सादर केले पुरावे
“भाजपाच्या ड्रग्ज कनेक्शनचा पर्दाफाश”, अतुल लोंढे यांनी सादर केले पुरावे
नागपूर : ड्रग्जच्या काळ्या धंद्यात भाजपाचे नेते आणि भाजपाशी संबंधित लोकांचे मोठे रॅकेट आहे, देशातील तरुणांना नशेखोर बनवण्याचा गोरखधंदा सुरू असून त्याच्याशी संबंध असलेल्या मनिष भानुशाली, के. पी. गोसावी, रविंद्र कदम आणि एनसीबीचे समीर वानखेडे यांचे रॅकेट काम करत आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. या रॅकेटमागील मास्टर माईंड कोण आहे, हे जनतेसमोर यावे यासाठी या सगळ्यांना अटक करावी आणि EOW आणि क्राईम ब्रँचमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणीही अतुल लोंढे यांनी केली आहे.
मुंद्रा बंदरावर सापडलेल्या ड्रग्स प्रकरणाची चौकशी DRI कडून काढून NIA कडे देण्यात आली. NIA गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत काम करते आणि त्याच मंत्रालयाचे मंत्री अमित शहा म्हणतात गौतम अदानी माझा मित्र आहे. pic.twitter.com/jaMEdEhs71
— Atul Londhe Patil (@atullondhe) November 2, 2021
“गुजरातमधील मुंद्रा अदानी पोर्टवर ३००० किलो एवढा देशातील सर्वात मोठा ड्रगसाठा सापडला आहे, याची किंमत २१ हजार कोटी रुपये आहे. देशातील तरुणांना नशेखोर बनवण्याचे एक मोठे षडयंत्र असून यात भाजपाचे नेते, भाजपाशी संबंधित लोकांचा सहभाग आहे. त्यामुळेच मुंद्रा पोर्टवरील या कारवईवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच मुंबईत NCBच्या मार्फत क्रूझवर रेड टाकून काही ग्रॅम ड्रग्ज पकडून हे प्रकरण तापवत ठेवले गेले, असा आरोपही लोंढे यांनी केला. मुंद्रा पोर्टवरील ड्रग्ज व मुंबईतील NCBची कारवाई यात काही समान धागेदोरे आहेत. के.पी. गोवासी, मनिष भानुशाली व एनसीबीचे समीर वानखेडे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे, असा दावाही लोंढे यांनी केला आहे.
“२१ सप्टेंबरला मुंद्रा पोर्टवर ड्रग्ज पकडले गेले त्यानंतर २२ सप्टेंबरला के पी. गोसावी व भानुशाली गुजरामध्ये पोहोचले व गुजरातचे मंत्री किरिटसिंह राणा यांना भेटले.. लल्लन टॉप या वेब पोर्टलाला मुलाखत देता देता मुझे कुछ काम था मुंद्रा म्हणत तो थांबतो…आणि मनिष भानुशाली ३ ऑक्टोबरला एक व्हिडिओ टाकून काम हो गया असे म्हणतो… काम हो गया हा संदेश त्याने कोणाला दिला व कोणते काम झाले याचा उलगडा झाला पाहिजे,” अशी मागणीही लोंढे यांनी केली आहे.
मुंद्रा अदानी बंदरावरील ड्रग्द, NCBची मुंबईतील रेड आणि ५० लाख रुपयांची देवाण घेवाण झाली (खंडणी) अशी माहिती सॅम डिसुझाने दिली होती, असे सांगत लोंढे यांनी काही पुरावेही मांडले आहेत. “या सर्व प्रकरणात एक इनोव्हा कार वापरण्यात आली, त्या इनोव्हा कारचा नंबर MH 12 JG 3000 असून ही इनोव्हा कार रविंद्र कदम यांच्या नावावर आहे. यासाठी जो पत्ता दिलेला आहे तो कराडचा आहे. कारच्या मालकाचे नाव रविंद्र कदम, पत्ता- ८१५, माणिक चौक, उंब्रज, तालुका कराड, जि. सातारा असा नोंदलेला आहे. पण आम्ही माहिती घेतली असता या पत्त्यावर रविंद्र कदम नावाचा कोणी व्यक्ती रहात नाही हे उघड झाले आहे. हा रविंद्र कदम कोण आहे, ज्या रविंद्र कदमची कार आहे तो यातील मास्टर माईंड आहे की प्यादे आहे किंवा त्याचा वापर केला गेला आहे का, हे स्पष्ट झाले पाहिजे. ही गाडी त्या ठिकाणी कशी गेली याची माहिती घ्यायची असले तर रविंद्र कमदला पकडून चौकशी करावी अशी मागणीही लोंढे यांनी केली आहे.



