महाराष्ट्र
1993 साली, गावात कुणाच्याच घरात गणपती नव्हता
1993 साली, गावात कुणाच्याच घरात गणपती नव्हता…
विकास गोडसे यांचे लेखन
साखर कारखान्यावर रहायचो. गणपती उत्सव मोठ्या जोशात साजरा होत असे. कारण कामगारांच्या पगारातुन पैसे कापुनंच वर्गणी गोळा केली जात असल्याने दहा दिवस नाटकं, ऑर्केस्ट्रा, लोकनाट्य तमाशा अशा कार्यक्रमांची रेलचेल असायची. मला तेव्हा दिवाळी नंतर गणपती हा सन सर्वात मोठा वाटायचा, तेंव्हा गणपतीला लाडानं नुसतंच बाप्पा म्हणायची वाही पण पडली नव्हती. तर आपण ज्या जगात राहतो जग तसंच आहे असा आपला समज होत असतो.
पण एकदा मी साधारण 1993 साली आमच्या गावी गेलो असता आढळलं कि गावात कुणाच्याच घरात गणपती नव्हता, कुणाच्याच घरी आरती वगैरे पण होत नव्हती, त्यामुळे कुणाची गणपतीची आरती पाठ असायचा पण संबंध नव्हता. लक्ष्म्या मात्र सगळ्यांच्या घरी असायच्या. मोठा सण. तेव्हा पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात एकही सार्वजनिक गणपती नव्हता. लोक नेहमी प्रमाणे सुर्यफुल, मुग, उडीद पिकं काढायच्या किंवा तुरी फवारायच्या नादात असत.
पण आमच्या कारखान्यावरच्या घरी आई वडील चतुर्थी करत, घरात मोदक बनत आई चंद्र उगवला कि जेवन करत असे. हे पण तसंच, मी गावी गेलो तर गावात कुणीही चतुर्थीचा उपवास करत नसत. म्हणजे जेवढं प्रस्थ आमच्या घरी होतं तेवढं गावात दिसलं नाही.
एकुण तेंव्हापासूनचं निरीक्षण आहे कि, माणुस गावातुन तुटला त्याला कृषी संस्कृतीची लाज वाटु लागली आणि तो मध्यमवर्गात घुसु लागला, तसं टिव्हीवर ग्लोरीफाय केलेल्या देवांना आपलं मानु लागला.
शिक्षित मध्यमवर्गीय होण्याचं पहिलं लक्षण कोणतं असेल तर, त्याचे देव, सनवार बदलतात. गावातल्या जुन्या खंडोबाच्या, जोतीबाच्या, भैरोबाच्या, शेतातल्या म्हसोबाची गर्दी कमी होऊन सनांचे आधुनिक रुप त्या घरात बाळसं धरू लागतं. पिढ्यानपिढ्या म्हसोबा, खंडोबा, भैरूबा पुजनारांचे वंशज आता गणपतीचा विद्येचा जप करू लागतात, गणपती उत्सव हाच सर्वात मोठा सन आहे असं त्यांना वाटु लागतं, तिरुपती बालाजी, साई बाबा पैसैवाल्या देवांची भक्ती वाढताना शिवंच्या आतलं देव, शिवं वरचं देव, रानाची राखन करनारे आणि सोबत देनारे देव डाऊन मार्केट वाटायला लागतात.
असं वाटायला लागलं कि समजायचं आपला विकास होतोय, टीव्ही वरच्या नटव्या आणि नटवे दिवसरात्र तुम्हाला हेच सांगतील कि तुमची कृषी संस्कृती डाऊन मार्केट आहे आम्ही म्हणु तीच खरी मराठी संस्कृती आहे आणि तुम्ही आम्ही त्याला बळी पडलो आहोत.
आई राजा उदो उदो.




