वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची खैर नाही ; आता होणार थेट वाहन जप्त
शरण खन्ना ठाणे :- वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन, ओव्हरस्पीड अशा अनेक कारणांमुळे लोकांना प्राण गमवावे लागतात. यामुळे वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यल्या कारवाई नंतर नागरिक वर्षानुवर्ष दंड भरत नाहीत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना जरब बसवण्यासाठी परिवहन मंत्रालयाने आणखी एक कठोर पाऊल उचललं आहे. ठाणे शहर वाहतूक शाखेने 1 लाख 16 हजार चालकांना नोटीसा पाठवल्या आहेत. वाहतूक शाखेकडून दंडात्मक रक्कम भरण्याची सुचना चालकांना 23 सप्टेंबर रोजी देण्यात आली आहे. दंडात्मक कारवाई केलेली रक्कम 25 सप्टेंबर पर्यंत भरा, अन्यथा राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये हजर राहावे, असं आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी केलं आहे.
वाहतूक नियमाचे उल्लघंन केल्यानंतर चालक दंड भरण्यास टाळाटाळ करतील आणि पुन्हा वाहतूक पोलिसांच्या कारवाईदरम्यान आढळून येतील अशा चालकांंवर पुन्हा वाहतूक पोलिसांच्या कारवाईत आढळल्यास वाहन जप्त करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचं श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितलं.नवी दिल्ली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 25 सप्टेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हा आणि तालुका न्यायालयीन क्षेत्रातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान, वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई करून वाहतूक नियम पाळण्याबाबत समुपदेशन करण्यात येत आहे. तरी देखील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेकडून चालकांवर विविध प्रकारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.


