महाराष्ट्रराजकीय

राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख होतील का?


राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे अमित शाह यांना भेटायला दिल्लीत गेले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा सुरु झाली. मनसे महायुतीत प्रवेश करणार इथपासून राज ठाकरे शिवसेना प्रमुख होतील इथपर्यंत अनेक अंदाज बांधले गेले. त्यात न्यूज मीडियाच्या विश्वसनीय सूत्रांनी राज ठाकरेंनी मनसे शिवसेनेत विलीन करावी असा प्रस्ताव अमित शाह यांनी ठाकरे यांच्यासमोर ठेवला असल्याचा कांगावा करायला सुरुवात केली. राजकारणात काहीही अशक्य नसतं हे जरी खरं असलं तरी ’फायदा’, ’लाभ’ याशिवाय कोणतेही डावपेच आखले जात नाहीत.

राज ठाकरे यांनी २००५ मध्ये शिवसेना सोडली आणि २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. सुरुवातीला मनसेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र या पक्षाला मराठीच्या मुद्द्यावर फारसे यश न मिळाल्यामुळे आता पक्षाने हिंदुत्व हाती घेतलं आहे. माझ्यासारखे अनेक मराठी तरुण सुरुवातीच्या काळात राज ठाकरे यांच्यासोबत गेले असले तरी १० वर्षांतच तरुणांचा भ्रमनिरास झाला आणि पक्षाला मिळत असलेला पाठिंबा कमीकमी होत गेला. राज ठाकरे हे सभा गाजवणारे नेते आहेत, कधीही कोणत्याही वेळी ते ट्रेंडिंग होऊ शकतात, ही क्षमता जरी त्यांच्यात असली तरी मतदाराला आपल्याकडे वळवण्यात ते अपयशी ठरले आहेत. हिंदुत्व स्वीकारायच्या आधी त्यांनी राष्ट्रवादीसाठी प्रचार केला होता. ’लाव रे तो व्हिडिओ’ हा ठाकरेंचा डायलॉग खूप गाजला. मात्र ठाकरेंनी मोदींचा कितीही अपप्रचार केला तरी जनतेच्या मनावर कोणताच परिणाम झाला नाही आणि मोदी पुन्हा बहुमताने निवडून आले. इतकंच काय तर शिवाजी पार्कातही त्यांच्या स्थानिक जनतेने मोदींवर टीका केली म्हणून नाराजी व्यक्त केली.  

थोडक्यात काय तर मनसेचा प्रभाव महाराष्ट्रावर राहिला नाही. मग प्रश्न असा उपस्थित राहतो की अमित शाह यांनी ठाकरेंसोबत गुप्त बैठक का घेतली? अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे की राज ठाकरेंना शिवसेनाप्रमुख पद देण्यासाठी भाजप आग्रही आहे. पण यात भाजपचा काय फायदा? आणि मग एकनाथ शिंदेंचं काय करायचं? कारण राज ठाकरे शिवसेनेत आले तर ते सर्वोच्च पद घेणार आणि शिंदेंना दुय्यम पद मिळणार. दुसरी गोष्ट ठाकरे आले तर पुन्हा कुटुंबवाद येणार. त्यांच्यानंतर त्यांचे वारसदार शिवनेसा अध्यक्ष होणार, जे भाजपला नकोय. आघाडी सरकार पाडून, शिवसेनेत बंड करुन एकनाथ शिंदेंनी आयुष्यातील मोठी जोखीम उचलली आहे. मग मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्याला दुय्यम स्थान आणि कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्याला सर्वोच्च स्थान देण्यात कोणतं आलंय शहाणपण? म्हणून राज ठाकरेंनी शिवसेना प्रमुख व्हावं हा मुद्दा गौण आहे. मग राज ठाकरेंना तातडीने का बोलावलं?

अबकी बार ४०० पार यामध्ये शाह यांना कोणताही अडथळा नकोय. भाजपला महाराष्ट्रातली पवार लॉबी संपुष्टात आणायची आहे आणि उद्धव ठाकरेंना राजकारणातून संन्यास घ्यायला लावायचा आहे. ठाकरे विरुद्ध ठाकरे असे वातावरण निर्माण करुन हे शक्य आहे. लोकसभेमध्ये जर राज यांच्याकडून लाभ मिळाला तर पुढे विधानसभा आणि पालिकेच्या निवडणुकीत मनसेला जागा देण्याबाबत विचार करता येईल. राज ठाकरेंची ताकद फारशी वाढू न देता त्यांना आपल्या बाजूने ठेवणे यात भाजपचा अधिक फायदा आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे महत्वाचे राज्य आहे. या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जर पवार लॉबीला मात दिली, उद्धव ठाकरे पूर्णपणे शक्तिहीन झाले तर महाराष्ट्रावर परिपूर्ण सत्ता स्थापन करण्याची भाजपची इच्छा पूर्ण होईल. आणि छत्रपती व सावरकरांचा महाराष्ट्र त्यांच्या तत्वांनी चालणार्‍या पक्षाला हातात जायला हवा.

  • लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे