महाराष्ट्रविदर्भसखी

आज समाज ‘ति’ला आधुनिक ‘हिरकणी’ म्हणतो आहे……


कोण ही ती? ही आहे गुंजन गोळे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली ही मुलगी आज तिच्या कर्तृत्वाने महाराष्ट्र गाजवते आहे. हो ! शब्दशः गाजवते आहे. 

  • आधुनिक धाराऊ गुंजनताई गोळे..

नोव्हेंबर महिना 2022, कडाक्याची थंडी, एका रात्री काळजाचा ठोका चुकवनारी एक घटना अमरावती च्या श्री पंजाबराव कृषी महाविद्यालयात घडली. एक स्त्री आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला घेऊन तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. तिचा जागीच मृत्यू झाला. अनेकांनी ती आत्महत्या आहे असा निकष काढला.. सुदैवाने बाळ वाचलं, मात्र मांडीची हड्डी 3 जागी तुटली. आईच्या मृत्यूनंतर भुकेने व्याकुळ झालेलं ते बाळ तब्बल 10 ते 11 तास सतत रडत, कुडकुडत त्या जंगली भागात, रात्रभर मेलेल्या आईच दूध प्यायचा प्रयत्न करू लागले पण त्याला कुठे माहिती की आपली आई या जगातच नाही आहे. सकाळी जेव्हा पोलिसांना ह्या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्या बाळाला बघून पोलिसांच्या डोळ्यासमोर पहिले नाव आले गुंजनताई गोळे.

गुंजनताई घटनास्थळी पोहचल्या आणि बघतात काय तर मेलेल्या आईची अंगावरील कुर्ती छातीच्या एका भागातून पूर्ण फाटून गेली आहे. म्हणजे रात्रभर त्या लेकरानी दुधासाठी किती धडपड केली असेल याची तिव्रता ताईला कळली ताईने लगेच त्या बाळाला शेकडो लोकांच्या गर्दीत आपल्या छातीशी घेतलं आणि त्या बाळाला स्वतःच दूध पाजलं तेव्हा कुठे ते बाळ शांत झाल व थोडं का होईना झोपी गेले.. दिवसभर कुशीत घेऊन ताईने त्याला कित्येकदा दूध पाजलं आणि मातृत्वाची एक वेगळी ओळख परत एकदा या स्वार्थी जगात फक्त आपल्या पुरत्या जगण्याचा विचार करणाऱ्या समाजाला दिली.. अश्या कृती फक्त दिखाव्यासाठी काम करणाऱ्या लोकांच्या हातून कधीच होऊ शकत नाही.

 त्यासाठी अंतर्मनातुन प्रामाणिक आणि निस्वार्थ असलेली लोकच असे अतुल्य कार्य करू शकतात आणि गुंजनताई त्यापैकीच एक आहेत असे म्हटल्यास गैर ठरणार नाही. कारण आजवर अनेक नवजात बालकांना तसेच ज्या बाळांना आईच दूध मिळत नाही अशांना ताईने स्वतःचे दूध पाजले आहे एवढंच नव्हे तर प्रत्येक बाळाला आईचे दूध भेटावे यासाठी मिशन दूधदान ही चळवळ सुरू करून आपले समाजाप्रती असलेले कर्तव्य पूर्ण केले आहे. ह्युमन मिल्क बँक असूनही त्यामध्ये दुधाचा साठा उपलब्ध नसल्याने अनेक बालकांना आईच दूध मिळत नाही. शहरामध्ये स्तनदा माता योग्य मार्गदर्शन नसल्याने किंवा काही इतर कारणानें आजही आपले जास्तीचे दुध मिल्क बँक ला न देता फेकून देतात हा मोठा प्रश्न आहे यावर उपाय म्हणून घरी जाऊन आईचे दूध कलेक्ट करून ते मिल्क बँक ला आणून देने हे मोठे धाडसी पाऊल गुंजनताईने अमरावती मध्ये उचलण्याचा निर्णय घेतला व काम सुरू सुध्दा केले.. वैयक्तिक पातळीवर एकटी स्त्री म्हणून, एकही रुपया न घेता-देता, पूर्णपणे निस्वार्थ पध्दतीने ही चळवळ उभी करनारी किंवा पुढाकार घेणारी गुंजनताई ही देशातली नाही तर जगातील पहिली महिला ठरेल यात दुमत नाही.. एकप्रकारे या आपल्या समाजावर गुंजनताईच्या ‘दुधाचं कर्ज’ आहे असे म्हटले तरी ते अतिशोयोक्ती होणार नाही..

आजच्या या धकाधकिच्या आयुष्यात जिथे आपल्याला शेजारच्या घरी कोण राहते, हे माहित नसते तेथे ताई गेल्या एका दशकापासून सातत्याने , न थांबता, न थकता समाजाच्या शेवटच्या घटकाला कसा न्याय मिळेल यासाठी धडपड करीत आहेत. अनेक अनाथ, एड्सबाधित, निराधार, बेवारस, मनोरुग्णांसाठी कार्य करत आहेत.. आता लोक त्यांना अनाथांची माय, महाराष्ट्राची आधुनिक धाराऊ, द रियल हिरो गुंजनताई गोळे म्हणून ओळखायला लागले आहे. पण त्यांचा संघर्ष आजही सुरूच आहे.

अमरावती जिल्ह्यात एका लहान खेडेगावात सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या गुंजनताई आज त्यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्र गाजवत आहेत. हो ! शब्दशः गाजवतच आहेत.

२०११ सालची गोष्ट, एके दिवशी अमरावतीच्या राजकमल चौकात ताईंना एक मनोरुग्ण महिला अर्धानग्न अवस्थेत रस्त्याच्या कडेला दिसली. त्या महिलेच्या अंगावर जेमतेम कपडे होते. केस सुटलेले, अनेक दिवस अंघोळ न केल्याने ती विचित्र दिसत होती. त्यातच ती गरोदर आहे हे ताईच्या लक्षात आलं. नक्कीच कोणीतरी नराधमाने तिला आपल्या वासनेचं शिकार केलं असणार!

ते दृश्य बघून ताईंना खूप रडू आलं. किळस वाटली. स्वत:ला माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटायला लागली. ताईंनी सगळा धीर एकवटला. त्या महिलेला घेऊन तिची योग्य ती सोय लावण्याचा ठाम विचार केला आणि अजून एक विचार केला, तो म्हणजे अशा महिलांसाठी कार्य करण्याचा!आणि तेव्हापासून सुरू झालेला या सेवाव्रती चा सेवायज्ञ सतत धगधगत आहे..

देशाबाहेर जाऊन सुद्धा गुंजनताईनी निस्वार्थ सेवा दिली आहे.. नेपाळ च्या भूकंप मध्ये अमरावती हुन एकटीने जाऊन तिथे सेवाकार्य केले आहे.. केदारनाथ व जम्मूकाश्मीर च्या आपदे मध्ये सुद्धा आपले विशेष सहकार्य केले आहे व तेही कित्येक दिवस व निस्वार्थीपणे…

अमरावती मध्ये आजवर अनेक रस्त्यावरील बेवारस मृतदेहांचा अंतिम विधी सुद्धा गुंजनताई स्वतःच्या पैश्यातून करतात. यासाठी त्यांचे पती अश्विन तळेगांवकर यांचीही त्यांना मदत असते हे विशेष. आजवर कित्येक नवजात बालकांना ताईंनी मृत्यूच्या जबड्यातून वाचवले आहे. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या आणि रस्त्यावर फेकून दिलेल्या अनेक नवजात शिशुंना जीवदान दिले आहे.

गुंजनताईंशी बोलताना ताईंचा बिनधास्त स्वभाव, समाजासाठी वाटणारी तळमळ शब्दाशब्दातून जाणवते. कुणाशी बोलतांना सन्मानांचा किंवा पुरस्कारांचा उच्चार देखील त्या करत नाहीत . मात्र आजवर ताईंना शेकडो पुरस्कार भेटले आहेत…

दिल्ली येथे कर्मवीर अवार्ड , ‘द रिअल हिरो’, ‘हिरकणी अवॉर्ड, राज्यस्तरीय ‘भीमरत्न पुरस्कार’ , ‘वुमन्स अचिव्हर अवॉर्ड’, लोकमत पेपर चा सामाजिक क्षेत्रातील ‘सखी सन्मान पुरस्कार’, सकाळ पेपर चा ‘यूथ इन्स्पिरेटर अवॉर्ड’, दै दिव्य मराठी पेपर चा ‘प्राउड महाराष्ट्रीयन अवॉर्ड, अमरकंटक मध्यप्रदेश येथे सेवाव्रती पुरस्कार, प्रतिदिन अखबार चा नारी सन्मान पुरस्कार, सोलापूरचा राज्यस्तरिय सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय ‘समाजभूषण’ पुरस्कार. विद्या प्रतिष्ठान बारामती चा स्त्रीरत्न पुरस्कार, महाराष्ट्राची हिरकणी पुरस्कार सातारा, तसेच दोनवेळा अमरावती महानगरपालिकाचा सामाजिक क्षेत्रातील मानाच्या पुरस्कारने व इतर अनेक पुरस्काराने नेहमीच गौरवण्यात आले आहे.सदैव सेवाकार्यात स्वतःला वाहून घेतलेल्या गुंजनताईचा शालेय तसेच महाविद्यालयीन काळ सुध्दा फार भन्नाट यशाचा राहिला आहे हे विशेष.. ताईने एकेकाळी राष्ट्रीय रायफल शूटिंगमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेले आहे. २६ जानेवारीच्या परेडमध्ये देखील तिला महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. NCC मध्ये तिला राष्ट्रीय कलरकोट आहे.. क्रीडा स्पर्धेत तब्बल 10 वर्षे अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत.. त्या उत्कृष्ट लिखाण करतात, सुंदर गाणे गातात, नृत्य करतात, चित्रे काढतात..कला, क्रीडा, साहित्य, सर्व क्षेत्रात त्या अग्रेसर आहे. कामाच्या व्यापातून थोडा तरी वेळ आपला आवडता छंद जोपासन्यासाठी द्यावा असे त्यांचे मत आहे..

अमरावती मध्ये मार्डी रोड राजुरा गावाजवळ गुंजनताईने अनाथ, निराधार , बेवारस व एड्सबाधित लेकरांसाठी “गोकुळ” हा निवासी प्रकल्प सुरू केला आहे.. त्याला कुठलीही शासकीय अनुदान किंवा मदत नाही..स्वतःची पूर्ण जमापुंजी, बँकेचे लोन काढून व लोकसहभागातून त्या प्रकल्प चालवतात. आजवर अनेक लोकांचे आयुष्य ताईने खऱ्या अर्थाने उज्वल केले आहे. . गोकुळ चालविताना अनेक संकटांना रोज त्यांना सामोरे जावे लागत आहे पण ताईच्या चेहऱ्यावर सतत हसूच असते हे विशेष

एकाच वेळी घर, समाज आणि राष्ट्र अशा तीनही आघाड्यांवर आपल्या कार्यकर्तृत्वाने एक वेगळी मुद्रा उमटवणाऱ्या गुंजनताई ला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे