महाराष्ट्रराजकीय

क्षणिक राजकीय वर्चस्वासाठी महत्त्व देणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाचा आजचा निकाल मोठा धडा..

उद्धव ठाकरे आज अडचणीत आहेत. पण याने निराश होण्याची गरज नाही.  

निकाल पक्षपाती की नि:पक्षपाती चर्चा होत राहील; पण पक्षनिष्ठेपेक्षा ‘निवडून येण्याचा निकष’ शिवसेनेच्या अंगलट आलेला दिसतोय. विचारांशी काडीमात्र संबंध नसलेल्या दबंग, गुन्हेगार, करोडपतींना क्षणिक राजकीय वर्चस्वासाठी महत्त्व देणाऱ्या राजकीय पक्षांना ( भाजपा सोडून ) निवडणूक आयोगाचा आजचा निकाल मोठा धडा आहे.  

निवडणुकीत पैसा लागतो, गुंडगिरी लागते, हा भ्रम राजकीय पक्षांनी उभा केला तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात येऊ नये म्हणून ! पण आज दबंग घातकी निघाले आणि सामान्य ठरवले गेलेले कार्यकर्ते शिवसेनेसोबत राहिले. यातून उद्धव ठाकरे आणि इतर भाजपेतर राजकीय नेते काही शिकतील का, यावर त्यांचं पुढचं भवितव्य अवलंबून आहे.  

भारतातल्या राजकारणात धक्कादायक असं काही उरलं नसल्याने जर उद्या आणखी घडामोडी घडून राज ठाकरे मनसे विसर्जित करून शिवसेनाप्रमुख झाले तर उद्धव ठाकरेंचा पुढचा राजकीय प्रवास खडतर असेल.  

एकतर त्यांना ‘आमचं हिंदुत्व, त्यांचं हिंदुत्व’ हा बालिशपणा सोडावा लागेल. हिंदुत्व ही फसवी राजकीय संकल्पना असून सर्वसामान्य माणसाच्या हिताचं त्यात काहीही नाही. हिंदुत्वच कशाला कुठल्याही प्रकारचा धर्मवाद कुचकामी असतो, हे उद्धव ठाकरेंनी अजूनही नीट लक्षात घेतलेलं दिसत नाही.  

प्रबोधनकार की कडवे हिंदुत्ववादी बाळासाहेब की दोघांचा सामाईक प्रागतिक विचार या संभ्रमातून उद्धव ठाकरेंनी बाहेर पडण्याची गरज आहे आहे. महाराष्ट्रातील सुधारणावादी वैचारिक परंपरेची सुस्पष्ट कास, एका अर्थी महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचं उघड राजकीय प्रतिनिधित्व केल्याशिवाय उद्धव ठाकरेंना गत्यंतर नाही.  

काॅंग्रेस-राष्ट्रवादीवर फार विसंबून राहून चालणार नाही. कारण त्यांचीही लवकरच ‘शिवसेना’ होणार आहे. या दोन्ही पक्षांत कमालीचं साचलेपण आलेलं आहे. भाजपाविरोधावर हे दोन्ही पक्ष तगू पाहतात. वैचारिक ओळख त्यांनी कधीच गमावलेली आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यानंतरच्या राजकारणात नव्याने सुरुवात करायची संधी उद्धव ठाकरेंकडे आहे.  

भाजपाच्या हिंदुत्वात तसंही  ठाकरेंना मानाचं स्थान मिळणं कठीण होतं. ज्या विचारधारेचा आपण पुरस्कार करतोय, तिथे आपलं सामाजिक स्थान काय, याचा दूरगामी विचार न केल्याने उद्धव ठाकरे आज अडचणीत आहेत. पण याने निराश होण्याची गरज नाही.  

मैदान मोकळं झालंय आणि महाराष्ट्रात एक मोठी संख्या विचारशील युवा नेतृत्वाची आहे, जी संधीच्या प्रतिक्षेत आहे. फक्त राजकारणाचा टिपिकल पॅटर्न बदलण्याची गरज आहे.

लेखन – राज असरोंडकर – Raj Asrondkar

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे