उद्धव ठाकरेंच्या हातून ‘शिवसेना’ गेली; एकनाथ शिंदे यांनाच शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण !
या निकालामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
मुंबई – सत्तांतरानंतर शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि चिन्हाबाबत उद्भवलेल्या वादावर आताच्या घडीत सर्वांत मोठी बातमी समोर आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी हा सर्वांत मोठा झटका आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.
आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांत मोठा भूकंप आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात ४० आमदारांसोबत बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना आपल्यासोबत घेऊन सूरत, त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या.
एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणले होते. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरू होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणे अपेक्षित होते. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केला. या निकालामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.



