कृषीवार्तामहाराष्ट्र

शेतकऱ्यांचे संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत, साखर कारखाने सुरु राहतील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

1 मे नंतर गाळप झालेल्या अतिरिक्त ऊस गाळपासाठी २०० रू प्रतिटन अनुदान


झूम मराठी

मुंबई, दि. १७ राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शिल्लक आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले.

आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त ऊस गाळप अनुदान आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषिमंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम,  मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सहकार विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता, कृषि सचिव एकनाथ डवले, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या  हितासाठी दि. 1 मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून रुपये 200 प्रती टनाप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

श्री.पाटील म्हणाले, ऊसाचे गाळप शिल्लक असल्यामुळे सुमारे १०० कोटी रुपयांचा वित्तीय भार पडणार असून राज्यात १ मे २०२२ नंतर हंगाम संपेपर्यंत अंदाजे ५२ लाख टन गाळप अपेक्षित आहे. यापैकी आजअखेर ३२ लाख टन गाळप झाले आहे. तसेच १ मे २०२२ नंतर गाळप होणाऱ्या व ५० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर वाहतूक होणाऱ्या साखर आयुक्तांनी अनिवार्य ऊस आदेश काढलेल्या ऊसास प्रतीटन पाच रुपये प्रती किलोमीटर वाहतूक अनुदान देण्यात येईल, असेही सहकार मंत्री श्री.पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये राज्यात एकूण १३.६७ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. सन २०२०-२१ मध्ये ११.४२ लाख हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली होते. मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र अधिक आहे. तसेच १६ मे २०२२ अखेर १०० सहकारी व ९९ खासगी असे १९९ साखर कारखान्यांकडून १३००.६२ लाख टन ऊस गाळप झालेले आहे. मागील वर्षापेक्षा सुमारे ५५,९२० टन प्रतीदिन जास्त गाळप क्षमतेने गाळप होत आहे. मागील वर्षी याच दिनांकास १०१३.३१ लाख टन गाळप झालेले होते. चालू वर्षी २८७.३१ लाख टन गाळप जास्त झालेले आहे. बीड, जालना, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये ऊस शिल्लक राहण्याचे प्रमाण अधिक आहे. याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे