आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, कुणीही… राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा!
मुंबई :- मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे. ४ मे रोजी मनसे कार्यकर्त्यांनी भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन सुरू करण्यापूर्वीच पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई केली होती. यासंदर्भात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुले पत्र लिहिले. आपल्या ट्विटर हँडलवरून हे पत्र ट्विट केले. पत्रामध्ये राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाहीर इशारा दिला.
राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे;
आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.
सत्ता येत- जात असते.
कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही.
उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!@CMOMaharashtra pic.twitter.com/M0hpLg7sfP— Raj Thackeray (@RajThackeray) May 10, 2022
“राज्य सरकारला माझे एकच सांगणे आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!” असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
“मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मी आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखे वागत आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी ४ मे रोजी ‘भोंगे उतरवा आंदोलन’ सुरू करण्यापूर्वीच त्यांची धरपकड सुरू करण्यात आली. २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या. हजारोंना तडीपार केलं. अनेकांना तुरुंगात डांबले. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!” असा टोमणा उद्धव ठाकरेंना मारला.
“गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे, ते पाहता मला प्रश्न पडलाय की मशिदींमध्ये ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? संदीप देशपांडे आणि इतर कार्यकर्त्यांना पोलीस असे शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैदराबाद संस्थानातले रझाकार आहेत. ” असे राज ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे.
“मनसे कार्यकर्त्यांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत, हे समस्त मराठीजन, तमाम हिंदुजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. ” असे राज यांनी बजावले आहे.
Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. झूम मराठीच्या टीमने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व झूम मराठी स्वीकारत नाही.



