मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या निर्धारावर आलेल्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अखेर अटक करण्यात आली आहे. खार पोलिसांनी त्यांच्यावर १५३ (अ) कलमाअंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य करणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि शांतता भंग करणे असे गुन्हे दाखल केले आहे. काही वेळेपूर्वीच राणा दांपत्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस राणा यांच्या घरी दाखल झाले होते. वॉरंट आणल्याशिवाय आपण पोलीस ठाण्यात येणार नाही, अशी भूमिका राणा दांपत्याने घेतली. मात्र अखेर कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्यांना पोलिसांच्या गाडीतून खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दुपारीच आपले आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांना मुंबईच्या बाहेर सोडणार असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, मुंबईत पोलीस विनंती करण्यासाठी राणा यांच्या घरी गेले. मात्र, नवनीत राणा यांनी फेसबुकवर व्हिडीओ लाईव्ह करून पोलीस आपल्याला जबरदस्तीने घेऊन जाण्यासाठी आले आहे, असा दावा केला होता. दोन दिवस आम्ही घराबाहेर पडलो नाही तरी आमच्यावर गुन्हा दाखल केला. आमच्या घरावर हल्ला करणाऱ्यांवर मात्र गुन्हा दाखल होत नाही. मग आमच्यावर कसा होतो, असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी केला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते संजय राऊत, अनिल परबांविरोधातही गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे रवी राणा म्हणाले होते. भाजपच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांच्याविरुद्ध खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मात्र त्यांच्याविरुद्ध कोणते कलम लावण्यात आले आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे आव्हान दिले होते. त्यामुळे एका नवीन राजकीय वादाला तोंड फुटले. याच दरम्यान शिवसैनिकांनीही आक्रमक भूमिका घेतली. खासदार नवनीत राणा व त्यांच्या पतीवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी शिवसैनिकांनी लावून धरली. त्या अनुषंगाने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी राणा दांपत्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा