मुंबई: संसर्गाचा धोका हळूहळू कमी होत आहे, मात्र काही भागात रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. तसेच यादरम्यान दैनंदिन ४० हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत होती. पण आता गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारांनी वाढत आहे. या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहेत. राज्यात काही भागात रुग्णवाढ कमी झाली आहे आणि काही भागात रुग्णवाढ होत आहे. पण त्याठिकाणी चिंता करण्यासारखे कारण नाहीये. त्यामुळे राज्यात तिसऱ्या लाटेचा पीक येऊन गेला असे म्हणता येऊ शकत, असे राजेश टोपे म्हणाले
‘तिसऱ्या लाटेचा पीक येऊन गेलाय, असे म्हणता येईल. कारण आता मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणी मोठ्या संख्येत रुग्णवाढ होत होती. मात्र आता या ठिकाणी रुग्णवाढ कमी झाली आहे. पण राज्यात इतर भागात रुग्णसंख्या वाढतेय. म्हणजेच नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा मेट्रो शहरात आणि ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढतेय. परंतु त्याठिकाणी चिंता करण्यासारखी परिस्थिती यासाठी नाही आहे की, सगळेजण ७ ते ८ दिवसांत बरे होत आहेत. त्यांना जास्त उपचाराची गरज पडत नाहीये,’ असे राजेश टोपे म्हणाले.
महाराष्ट्रात काल, शुक्रवारी २४ हजार ९४८ नवे कोरोनाबाधित आढळले असून १०३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच ४५ हजार ६४८ जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या महाराष्ट्रात २ लाख ६६ हजार ५८६ सक्रीय रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७६ लाख ५५ हजार ५५४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४२ हजार ४६१ जणांचा मृत्यू झाला असून ७२ लाख ४२ हजार ६४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा