पाचोरा तहसीलदारांनी अनाथ विद्यार्थ्यांसोबत आपल्या लेकीचा वाढदिवस केला साजरा

पाचोरा : वाढदिवस म्हटले की केक, पार्टी आणि जल्लोष अशीच सर्वसाधारण संकल्पना असते. मात्र पाचोराच्या तहसीलदारांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या लेकीचा वाढदिवस अनाथ विद्यार्थ्यांसोबत साजरा करून एक आदर्श निर्माण केला आहे.
अशा सामाजिक उपक्रमांमुळे प्रशासन आणि समाज यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाचोऱ्यात पाहायला मिळाले.
पाचोरा येथील लक्ष्मीबाई वारकरी शिक्षण संस्था मध्ये पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी आपल्या लेकीचा वाढदिवस अनाथ विद्यार्थ्यांसोबत साजरा केला, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या शिक्षण, आरोग्य व भविष्याबाबत जाणून घेतले. यावेळी वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मिठाई, शैक्षणिक साहित्य व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे अनाथ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. तहसीलदारांच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असल्याची भावना व्यक्त केली.



