वैजापूरात दोन दिवसीय बाल संस्कार शिबिर व निपुण FLN मेळावा उत्साहात संपन्न..

चोपडा (मनोज राजपूत) तालुका येथील वैजापूर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव आणि जि.प. शाळा वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय बाल संस्कार शिबिर व निपुण एफएलएन मेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात पहिल्या दिवशी गांधी कथा या सत्रापासून झाली. त्यानंतर जैवविविधतेचे महत्त्व आणि संरक्षण या विषयावर वैजापूर बीटचे फॉरेस्ट गार्ड विजय शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले. यासोबतच नैतिक मूल्यांवर आधारित मनोरंजनात्मक खेळ, स्पर्धा, पारंपरिक स्थानिक आदिवासी कला-संस्कृतीचे सादरीकरण तसेच प्रेरणादायी चित्रपटांच्या माध्यमातून मुलांना संस्काराचे धडे देण्यात आले.
शिबिराच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व नृत्य सादर करून आपल्या कला गुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. लहान मुलांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसर आनंदमय वातावरणाने भारावून गेला होता. त्यानंतर निपुण मेळाव्याचा समारोप करण्यात आला. समारोपानंतर बाहुल्यांच्या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यात आली.
बाल मेळावा गांधी रिसर्च फाउंडेशनच्या डिप्लोमा विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जि.प. शाळा वैजापूरचे मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, वैजापूर ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती चोपडा यांचेही सहकार्य लाभले. या मेळाव्यात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्टॉल्स उभारण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गट शिक्षण अधिकारी अजित पाटील यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कोळे, गांधी रिसर्च फाउंडेशनचे चंद्रकांत चौधरी, मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी तसेच अंगणवाडी सेविका गीता बारेला आणि अनिता पिंप्राळे उपस्थित होते. शाळेतील सर्व विद्यार्थी व वैजापूर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी, विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विकासपत्राच्या माध्यमातून घेतली. या शिबिर व मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे डिप्लोमा विद्यार्थी, मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, शिक्षक साठे सर, मनीषा पाटील, सुविधा मॅडम, भाऊसाहेब सर तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या मेळाव्यामुळे मुलांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे मान्यवरांनी मत व्यक्त केले. ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. आयोजकांच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना पुस्तके व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.



