महाराष्ट्र

आझादी का अमृतमहोत्सव -‘फ्रीडम रन’ हा राष्ट्रीय कार्यक्रम

मौजे पाली येथे आझादी का अमृतमहोत्सव -‘फ्रीडम रन’ हा राष्ट्रीय कार्यक्रम उत्साहात संपन्न

शहापूर (प्रतिनिधी) रविवार दिनांक 10 ऑक्टोबर, 2021 रोजी शहापूर तालुक्यातील मौजे पाली येथे भारत सरकार युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, नेहरू युवा केंद्र ठाणे आणि स्वामी विवेकानंद संस्था, पाली व श्री साईश्रद्धा सेवाभावी ट्रस्ट, सरवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आझादी का अमृतमहोत्सव’ उपक्रमांतर्गत

‘फ्रीडम रन’ हा राष्ट्रीय कार्यक्रम विश्वगुरू सन्मानित राष्ट्रीय धर्माचार्य ह.भ.प. नामदेव महाराज हरड यांच्या अध्यक्षतेखाली आणि नेहरू युवा केंद्राचे ठाणे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला, ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीष रेंघे, भिवंडी येथील समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष सोन्या पाटील, सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. गोविंद महाराज तरणे, प्रसिद्ध उद्योजक अनिल मानिवडे, सरस्वती विद्यालयाचे माजी प्राचार्य भगवान जाधव सर, मानवसेवा विकास फाऊंडेशनचे प्रदेश संघटक व्ही.एस.पाटील सर, सिने-नाट्य अभिनेते सचिन पाटील, ठुणे केंद्रप्रमुख डॉ.विलास वेखंडे, स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील म्हसकर, सचिव संजय तरणे, श्री साईश्रद्धा ट्रस्टचे संस्थापक विष्णू भोईर व मार्गदर्शक डॉ. अमोल बहिनावल, राजेश पाटील, गणपत चौधरी, उत्कर्ष महाविद्यालयाचे माजी चेअरमन अरुण भालेकर, साहित्यिक व पत्रकार प्रकाश फर्डे यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाला! यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले व स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतमाता यांच्या प्रतिमांचे पूजन केले. स्वामी विवेकानंद संस्थेचे उपाध्यक्ष तथा गंधार संगीत विद्यालयाचे संस्थापक अनंता तरणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या साक्षी अधिकारी, रेश्मा पाटील आदी विद्यार्थ्यांनी सुमधुर असे ईशस्तवन व स्वागतगीत आणि देशभक्तीपर गीत सादर केले. स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील म्हसकर सर आणि श्री साईश्रद्धा ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू भोईर तसेच दोन्ही संस्थेच्या पदाधिकारी यांनी उपस्थित मान्यवरांचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत केले! तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करतांना सुनील म्हसकर म्हणाले की, ” हा राष्ट्रीय अमृत महोत्सव साजरा करण्याची जबाबदारी देशाने नेहरू युवा केंद्राच्या वतीने आपल्या स्वामी विवेकानंद संस्था व श्री साईश्रद्धा सेवाभावी ट्रस्ट, सरवली या दोन संस्था आणि आपल्या सगळ्यांवर सोपविली आहे, हे आमचे भाग्य आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त देशभरात साजरा होत असलेला‘आजादी का अमृत महोत्सव’ हा देशवासियांच्या मनांना जोडणारा उपक्रम आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मी आपल्या सर्वांना करत आहे !” या राष्ट्रीय कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते 75 आदिवासी महिलांना कपडे वाटप व आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच उपस्थित सर्वांना मास्क व खाऊचे वाटप करण्यात आले! सदर कार्यक्रमात सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. गोविंद महाराज तरणे यांना त्यांच्या संपूर्ण जीवनभरातील अध्यात्मिक सेवेबाबत स्वामी विवेकानंद संस्थेतर्फे उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले! तर सुनील म्हसकर यांनी, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य, पर्यावरण आदी क्षेत्रातील कार्यामुळे गावाचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर केल्याबाबत मौजे पाली ग्रामस्थांनी सुनील म्हसकर यांस जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले! तसेच यावेळी ठुणे केंद्रप्रमुख डॉ.विलास वेखंडे यांच्या शिक्षण क्षेत्रातील उत्तम योगदानाबद्दल तसेच मुंबई विद्यापीठाच्या वतीने शिक्षणशास्त्र विषयात डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याने ‘राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार’, सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. डॉ.कैलास महाराज निचिते यांना त्यांच्या संपूर्ण जीवनभरातील आध्यात्मिक सेवेबाबत आणि त्यांस अमेरिकेतील साऊथ वेस्टर्न युनिव्हर्सिटी तर्फे आध्यात्मिक विज्ञानातील मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याने ‘राज्यस्तरीय आध्यात्म रत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले! त्याचप्रमाणे सापगाव येथील भातसा नदीला पूर आलेल्या भयंकर स्थितीत अपघातग्रस्त बुडत्या कारमधील लोकांचे जीव वाचवण्यासाठी वेळीच आपल्या प्राणांची पर्वा न करता देवदूत बनून धावून जाणारे धाडसी व्यक्तिमत्त्व रमेश अंदाडे, पंकज अंदाडे, दर्शन घरत तसेच ठाणे येथील श्रीरंग विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक नितीन चव्हाण, सरस्वती विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक अरुण भालेकर व श्याम शेलार, पाषाणे येथील वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाचे सहशिक्षक शिवाजी सातपुते, पाली येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका कमल जाधव, सहशिक्षिका दीपाली शिरसाट, अंगणवाडी सेविका शोभा तरणे, हिराबाई तरणे, आशा सेविका शैला तरणे, ह.भ.प. जयराम तरणे, बचतगट समन्वयक ललिता रंदवी, आदिवासी मुला-मुलींना नेतृत्व व नृत्याचे धडे देणारी लक्ष्मी वाघे यांचा त्यांनी कोरोनाच्या कठीण परिस्थितीत केलेल्या उल्लेखनीय योगदानाबाबत स्वामी विवेकानंद संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला!

 याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीष रेंघे म्हणाले की, “स्वातंत्र्याला होत असलेल्या 75 वर्षांचे औचित्य म्हणजे वर्तमानातल्या पिढीला अमृत अनुभव मिळणार आहे. हा एक असा अमृत अनुभव मिळणार आहे, त्यामुळे प्रत्येकक्षण देशासाठी जगावे, देशासाठी काही तरी करावे, यासाठी तो प्रेरणादायी असणार आहे. आज आपण ठाम निर्धार करू या की, आपण सदैव आपले मन व शरीर स्वस्थ, निरोगी, स्वच्छ ठेवू!” तर नेहरू युवा केंद्राचे ठाणे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला मार्गदर्शन करताना म्हणाले की, “जर आपण देशासाठी, समाजासाठी, प्रत्येक भारतीय एक पाऊल चालत असू, तर देश 130 कोटी पावले पुढे जाऊ शकतो.

भारत पुन्हा एकदा आत्मनिर्भर बनेल, जगाला नवी दिशा देईल. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा एक प्रकारे संपूर्ण भारताला आपल्यामध्ये सामावून घेणारा एक मोठा महोत्सव आहे. देशाच्या प्रगतीचा, देशाला पुढे नेण्याचा प्रत्येक नागरिक संकल्प करेल, प्रत्येक संस्था संकल्प करेल, प्रत्येक संघटना संकल्प करेल. स्वातंत्र्यासाठी लढलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हाच एक मार्ग असेल.

युवा पिढीने सक्षम, समर्थ व आत्मनिर्भर राष्ट्र घडविण्याचा आदर्श मनात ठेऊन पुढील वाटचाल करण्याची गरज आहे.” तर कार्यक्रम अध्यक्ष विश्वगुरू सन्मानित राष्ट्रीय धर्माचार्य ह.भ.प.नामदेव महाराज हरड उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, “आपल्या वेदांमध्ये म्हटले आहे की- मृत्योः मुक्षीय मामृतात्।

याचा अर्थ असा आहे की, आपण दुःख, कष्ट, क्लेश आणि विनाश यांच्यातून बाहेर पडून अमृताच्या दिशेने पुढे जावे, अमरतेच्या दिशेने पुढे जावे. हाच संकल्प स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचाही आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे – स्वातंत्र्याच्या शक्तीचे अमृत, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे- स्वातंत्र्य सैनानींच्या प्रेरणांचे अमृत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे- नवीन विचारांचे अमृत. नवीन संकल्पांचे अमृत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे- आत्मनिर्भरतेचे अमृत. आणि म्हणूनच हा महोत्सव राष्ट्राच्या जागरणाचा महोत्सव आहे. हा महोत्सव, सुराज्याची स्वप्ने पूर्ण करण्याचा महोत्सव आहे. हा महोत्सव, वैश्विक शांतीचा, विकासाचा महोत्सव आहे.

आपण सर्वजण या अमृत महोत्सावातून भारताच्या उज्ज्वल भविष्याचे अमृत मिळविण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ या” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीरंग विद्यालयाचे सहशिक्षक नितीन चव्हाण यांनी केले तर स्वामी विवेकानंद संस्थेचे सचिव संजय तरणे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले! कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला!

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे