महाराष्ट्र

मराठा सेवा संघाच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त

मराठा सेवा संघाच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त.

“मराठा सेवा संघ” हा शब्द वाचला की अनेकांना प्रश्न पडतो, नेमकी कसली संस्था आहे. त्यांचे काम काय आहे? त्यांच्या माहिती साठी हा थोडासा लेखन प्रपंच.

१९९० सालापासुन मराठा सेवा संघ ही “पुरोगामी विचारधारेची ढाल आणि विकृतीवर आक्रमकपणे वार करणारी तलवार” अशी ओळख धारण करणारी सामाजिक चळवळ.

युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या विचाराने वाढत असलेली वैचारिक चळवळ आहे.

खरंतर मराठा सेवा संघाने नेमकं कोणतं कार्य केले हा प्रश्न महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना कधीही पडत नाही. परंतु समाजातील धार्मिक व जातीय द्वेष पसरवणाऱ्या विघातक प्रवृत्तींनी सर्वसामान्य लोकांपर्यंत मराठा सेवा संघ व त्याचे वास्तविक विचार पोहोचू नयेत म्हणून त्याविषयी जी बदनामीची मोहिम राबविली, जो अपप्रचार केला, जे चुकीचे चित्र समाजासमोर उभे केले त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मराठा सेवा संघाचे उद्देश्य व कार्य याविषयी प्रश्न पडणे साहजिक आहे. मराठा सेवा संघाच्या कार्याविषयी थोडक्यात घेतलेला हा आढावा वाचुन लोकांच्या माहितीत थोडी जरी भर पडली तर या लिखाणामागचा उद्देश साध्य झाला म्हणता येईल.

मराठा सेवा संघाने काय केले?

महाराष्ट्राच्या सामाजिक भुमीची नव्याने मशागत केली. समाजाला

“जय जिजाऊ जय शिवराय”

“एक मराठा लाख मराठा”

अशी आपुलकीची घोषवाक्यं दिलीत.

राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाला “जय जिजाऊ” असे अभिवादन मुल्य प्राप्त करुन, स्त्री शक्तीला श्रद्धा स्थान मानुन स्त्रीयांचा सन्मान करण्याची शिकवण देऊन लाखो लोकांना एकत्र आणले.

पूर्वी राष्ट्रमाता जिजाऊंचे कोणतेही चित्र उपलब्ध नव्हते, त्यांचे तैलचित्र बनवुन ते अधिकृत करुन राज्याच्या मंत्रालयात लावुन घेतले.

विधानसभेत शिवजयंतीच्या तारखेच्या वादावर चर्चा घडवुन १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची अधिकृत तारीख निश्चित करुन घेतली.

१२ जानेवारी जिजाऊ जयंती सिंदखेडराजा.

१९ फेब्रुवारी शिवजयंती किल्ले शिवनेरी.

१४ मे शंभुजयंती किल्ले पुरंदर.

६ जुन शिवराज्याभिषेक किल्ले रायगड.

हे उत्सव सुरु केलेत.

२९ ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रात शेतकरी दिन म्हणुन साजरा करण्यासाठी शासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला.

पानिपतच्या युद्धातुन वाचलेले रोड मराठा आणि महाराष्ट्रातील मराठा बांधवांचा मराठा मिलन समारोह घडवुन आणला.

धार्मिक, जातीय विद्वेषातुन दगडं उचलणाऱ्या युवकांच्या हातात वैचारिक पुस्तके दिलीत आणि महाराष्ट्रातील जातीय सलोखा वाढविला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्ता संघर्ष हा धार्मिक नव्हता हे बहुजन समाज व मुस्लिम बांधवांना पटवून दिल्यामुळे धार्मिक सामाजिक बंधुभाव निर्माण झाला.

बहुजन समाजाने विशेषतः युवकांनी राजकीय संघर्षात न पडता आपला व्यवसाय, शेती यावर लक्ष केंद्रित करुन प्रगती करावी हे पटवून दिले. सामाजिक सलोखा निर्माण झाला.

इतिहासाच्या पुनर्लेखनाची चळवळ उभी करुन इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्यांवर दहशत बसविली.

महापुरुषांचे विचार घराघरापर्यंत घेऊन जाणाऱ्या लेखक, वक्ते, शाहीर, कलाकारांची मोठी फळी निर्माण केली.

लेखकांना वाचकवर्ग दिला,

वक्त्यांना श्रोतावर्ग दिला,

कलाकारांना प्रेक्षकवर्ग दिला,

महाराष्ट्राला वैचारिकवर्ग दिला.

धार्मिक गोष्टींचा विचार करताना धर्माचा उदात्त विचार सांगणारी “शिवधर्म गाथा” दिली.

आपली नाणी, वाणी, लेखणी आणि करणी आपण आपल्याच लोकांविरोधात वापरु नये ही आचारसंहिता दिली.

युवकांना बुटाची पॉलिश ते डोक्याची मॉलिश पर्यंत कोणताही व्यवसाय करण्याची दृष्टी दिली.

धर्मसत्ता, राजसत्ता, शिक्षणसत्ता, अर्थसत्ता, प्रचार प्रसार माध्यमसत्ता यांचे महत्व समाजाला पटवुन दिले.

अज्ञान, अंधश्रद्धा, अहंकार आणि न्युनगंड ही समाजाच्या अधोगतीची कारणे आहेत याची समाजाला जाणीव करुन दिली.

समाजातील सांस्कृतिक दहशतवाद संपविणे साठी समाजाला सांस्कृतिक वारसा आणि बुद्ध, तुकोबा, शिव, फुले, शाहू, आंबेडकर ही साखळी समजावुन सांगितली.

मराठा सेवा संघाचे कार्य प्रत्यक्षात जितके दिसून येते, तितकेच अप्रत्यक्ष महाराष्ट्रातील सर्व समाज घटकांवर मराठा सेवा संघाच्या चळवळीचा प्रभाव पडला आहे.

आज या चळवळी मुळे अनेक युवक वेगवगेळ्या विषयांवर निर्भीडपणे व्यक्त होतात, त्यासाठी मराठा सेवा संघाचा मोठा आधार राहिलेला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे