राजकीय

अण्णा हजारे यांची संपादकाच्या विरोधात तक्रार, खोटी बातमी दिल्याचा आरोप, गुन्हा दाखल

‘लोकपत्र’ या वर्तमानपत्रात ‘नाही तरी शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड पाडतात: अण्णा हजारे’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती

औरंगाबाद येथील ‘लोकपत्र’ या वर्तमानपत्रात ‘नाही तरी शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड पाडतात: अण्णा हजारे’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, अण्णा हजारे यांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य अण्णा यांनी केलं नसल्याचा दावा केला आहे. हे वृत्त देणाऱ्या ‘लोकपत्र’ वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक रविंद्र विठ्ठलराव तहकिक आणि प्रकाशक अंकुशराव नानासाहेब कदम यांच्याविरुद्ध पारनेर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अहमदनगर जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पठाडे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर अण्णा हजारे यांनी एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं आहे.

काय म्हटलं आहे प्रसिद्धी पत्रात?

औरंगाबाद येथील ‘लोकपत्र’ या वर्तमानपत्रात ‘नाही तरी शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड पाडतात : अण्णा हजारे’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली बातमी वाचण्यात आली. बातमी वाचून आश्चर्य वाटले. जे विधान मी केलेलेच नाही, ते माझ्या तोंडी घालून समाजात द्वेष भावना निर्माण करण्यासाठी अशी खोटी बातमी प्रसिद्ध करण्यात आली असे वाटते. अधिक चौकशी करता असे निदर्शनास आले की, सदर बातमी फक्त औरंगाबाद येथील ‘लोकपत्र’ या एकमेव दैनिकात प्रसिद्ध झाली असून सदर दैनिकाचे औरंगाबाद आवृत्तीचे कार्यकारी संपादक ‘रविंद्र तहकिक’ हे त्यास जबाबदार आहेत.

यापूर्वीही अनेकदा ‘दैनिक लोकपत्र’ मधून माझ्याबद्दल आणि जन आंदोलनाबद्दल चुकीच्या व खोट्या बातम्या, लेख आलेले आहेत. अशीच एक खोटी बातमी छापल्याबद्द्ल आमचे वकिल श्याम असावा यांनी लोकपत्रचे रविंद्र तहकिक यांना 13 नोव्हेंबर 2019 रोजी कारवाईसंबंधी कायदेशीर नोटीस बजावली होती. ही नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली होती. म्हणून त्यानंतर आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले व कारवाई करण्याचे टाळले होते. परंतू आता पुन्हा त्यांनी अशीच खोटी बातमी छापून शिक्षक, पालक व विद्यार्थी वर्गामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.

समाजात शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. देशाचे भवितव्य असलेली नवीन पिढी घडविण्याचे काम शिक्षकच करीत असतात. त्यामुळे समाजात शिक्षकांविषयी आदराची भावना आहे. मीही शिक्षकांविषयी नेहमीच आदर व्यक्त केलेला आहे. परंतु काल लोकपत्रमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे मला खेद वाटला. तसेच संपूर्ण शिक्षक वर्गात संभ्रम निर्माण झाल्याचे सोशल मिडियावर दिसून आले. ही बाब समाजाच्या दृष्टीने चांगली नाही. मी नेहमी सांगत असतो की, दिवसेंदिवस वाढती द्वेषभावना ही समाज व देशासाठी घातक आहे. काही अविचारी लोक समाजात दुही, द्वेषभावना आणि तेढ निर्माण होईल असा प्रयत्न सातत्याने करीत असतात. त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होत असते.

वास्तविक, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला गेलेला आहे. त्यामुळे पत्रकारांनी व माध्यमांनी अत्यंत जबाबदारीने वागले पाहिजे. पण या क्षेत्रातही काही अपप्रवृत्ती असल्याचे सदर बातमीवरून दिसून येते. त्यातूनच अशा खोट्या बातम्या पसरवल्या जातात. औरंगाबाद येथील लोकपत्र या वर्तमानपत्रातून यापूर्वी अनेक वेळा माझ्याबद्द्ल तसेच शिक्षकांबद्द्लही चुकीच्या बातम्या छापलेल्या निदर्शनास आलेल्या आहेत. परंतू समाजाने जागरुक राहून अशा प्रवृत्तींना थारा देऊ नये. समाजातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील असा विचार करावा. शिक्षकी पेशा हा एक पवित्र पेशा आहे. शिक्षकांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये. तसेच गैरसमज करून न घेता आपले ज्ञानदानाचे पवित्र काम सुरू ठेवावे.

आमच्या वकिलांनी लोकपत्रच्या कार्यकारी संपादकांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून लवकरच त्यांना संबंधित नोटीस बजावण्यात येईल व कारवाई सुरू करण्यात येईल.

कि. बा. तथा अण्णा हजारे

राळेगणसिद्धी, ता. पारनेर, जि. अहमदनगर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे