जळगाव : राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात येत्या सोमवारपासून (ता.28) कडक निर्बंध लागू केले आहेत. तिसर्या लाटेचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार दुपारी चार वाजताच ‘शटर डाऊन’ होणार आहे. शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवावगळता इतर सर्व व्यवसाय व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

कोविड-19 या विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आपत्कालीन उपाययोजना म्हणून राज्यात लॉकडाउन टप्प्याटप्प्याने पारीत करण्यात येत आहे. जिल्ह्यात डेल्टा पल्सच्या अनुषंगाने सोमवारपासून (ता.28) लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे ‘ब्रेक द चेन’अंतर्गत शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील बाजारपेठा दुपारी चार वाजेपर्यंतच सुरू असणार आहेत. उत्पादनक्षेत्र 50 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू ठेवण्यात परवानगी देण्यात आली आहे. कोविड त्रिसूत्रीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. पालन न केल्याचे आढळून आल्यास आस्थापनाधारकांना पहिल्यांदा 25 हजार व पुन्हा आढळून आल्यास 50 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
नव्या निर्बंधनुसार सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत उघडी राहतील. जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व दुकान शनिवार-रविवार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे. वाइन शॉप, परमिट रूम सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते 4 पर्यंत खुली ठेवता येणार आहे. शनिवार- रविवार याच वेळेवर फक्त होम डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालय व शिवभजन सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते चार वाजेपर्यंत सुरू असणार असून आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती ठेवता येणार आहे. तसेच शनिवार-रविवार सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत फक्त होम डिलिव्हरी सेवा देता येणार आहे
सर्व शासकीय कार्यालय 50% क्षमतेनुसार सुरू ठेवता येणार आहे. उद्योग आणि कारखाने यांना पूर्ण वेळ काम करण्याची अनुमती देण्यात आली आहे. सर्व सार्वजनिक स्थळ, क्रिडांगण, बगीचे सकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत ठेवता येणार आहे. तसेच सर्व टॉकीज, सभागृह, नाट्यगृह व मल्टिप्लेक्स पूर्णता बंद राहणार आहे.
लग्न समारंभाकरिता 50 लोकांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत विवाह करता येणार आहे. अंतिम यात्रेकरता वीस लोक उपस्थित राहू शकतील. कृषी संबंधित सर्व काम दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार. सर्व प्रकारच्या सभा, बैठक, सहकारी संस्था, आमसभा यांना सभागृहाच्या आसन क्षमतेच्या 50% व झूम मीटिंग घेण्याचे निर्देशीत केले आहे.
50 टक्के क्षमतेवर जिम, व्यायाम शाळा, ब्युटी पार्लर, स्पा व वेलनेस सेंटर सुरू राहणार आहेत. सार्वजनिक वाहनांना शतप्रतिशत क्षमते सह काम करण्याची सोय दिली आहे. सायंकाळी पाच वाजतापासून संचारबंदी सुरू होणार आहे. दरम्यान, विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर प्रतिबंधित लावण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा