कृषीवार्तामहाराष्ट्र
लॉकडाउनचा मेंढपाळांनाही फटका! गावबंदीमुळे मेंढपाळ समाजाची कोंडी झालीय
मेंढ्यांचे वाडे गावशिवारातच फिरत असल्यामुळे सध्या चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. कोरोनाच्या कालावधीत अनेक ठिकाणी गावबंदी असल्यामुळे भटकंती करणाऱ्या मेंढपाळ समाजाची कोंडी झाली आहे.
झूम मराठी न्यूज वेब मीडिया
ललिता गढरी सहसंपादक झूम
राज्यात कोरोनासारख्या महामारीवर उपाय म्हणून संपूर्ण राज्यात ‘लाँकडाउन’ पाळण्यात येत आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार कोणीही बाहेर पडत नाही. मात्र पोट भरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मेंढपाळांना कोणी आसरा द्यायला तयार नाही. गावकुसाच्या बाहेर असे भेददर्शक वर्तुळ तयार होत आहे. या भयावह स्थितीत आमचे काय होणार? असा प्रश्न समूहासमोर उभा राहिला आहे.
महाराष्ट्रामध्ये अशा कितीतरी भटक्या जाती आहेत, ज्या अजून पूर्णपणे स्थायिक झालेल्या नाहीत. त्यांचे भटकेपण अंशतः संपले असेल किंवा वर्षांतील काही महिने ते भटक्यांचे जीवन जगत असले, तरी त्यांनी आपले समूहवैशिष्ट्य कायम ठेवलेले आहे. अशा भटक्यांपैकी धनगर ही एक जात आहे. या समूहातील ६० टक्क्यांहून अधिक समाजाला शेळ्या-मेंढ्याचे कळप घेऊन हिंडावे लागते. दऱ्याखोऱ्यातून, ऊन-पावसाच्या अडचणींना तोंड देत खडतर जीवन जगत शेळी-मेंढीपालन हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन राहिले आहे.

कोरोना दुसरी लाटेच्या संसर्ग काळातील निर्बंध कठोर होत असताना मेंढपाळ बांधवांपुढे मेंढ्यांच्या पोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मेंढ्यांचे वाडे गावशिवारातच फिरत असल्यामुळे सध्या चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. कोरोनाच्या कालावधीत अनेक ठिकाणी गावबंदी असल्यामुळे भटकंती करणाऱ्या मेंढपाळ समाजाची कोंडी झाली आहे. अनेक ठिकाणी गावातील घरे सोडून ग्रामस्थ शेतात स्थलांतरित झाल्याने बाहेरगावच्या मेंढपाळांना मळ्यामध्ये मेंढ्या बसविण्यास शेतमालकांकडून नकार मिळत आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भटकंतीवर राहणाऱ्या मेंढपाळ समाजानेही बाहेरगावी वाडे नेण्याऐवजी गावशिवारातच चराई करण्यासाठी पसंती दिली आहे. मात्र, ज्या गावांत पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, तेथे मेंढ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. दसऱ्यानंतर आपापले वाडे घेऊन भटकंतीवर निघणारे मेंढपाळ यंदा मात्र गावशिवारातच बंदिस्त झाले आहेत. मेंढ्यांचे पालनपोषण आजवर गाव परिसरात असलेल्या चाऱ्यावर होत होते. मात्र, आता गावशिवारातील चाराही संपुष्टात आल्याने तसेच कोरोनामुळे गावाबाहेर निघता येत नसल्याने मेंढीपालनाचा व्यवसाय चिंतेचा विषय ठरत आहे.

राज्यात आटपाडी, माण, खटाव आणि जत तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर, इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मेंढपाळांची संख्या आहे. हे मेंढपाळ दिवाळी झाल्यावर संसाराचा गाडा घोड्यावर घेऊन मेंढ्यांसह ठिकठिकाणी वस्ती करीत जिकडे चारा-पाणी मिळेल तिकडे स्थलांतर करीत असतात. खान्देशात जळगाव, धुळे, साक्री भागांत शेकडो मेंढपाळ आहेत. तेही चराईसाठी वेगवेगळ्या भागात स्थलांतर करत असतात.महाराष्ट्र मधील मेंढपाळ दर वर्षी परजिल्ह्यांमध्येही आपापले वाडे (तळ) घेऊन भटकंती करत असतात. मात्र, यंदा बाहेरगावी हे वाडे स्थलांतरित होऊ न शकल्याने मेंढपाळ बांधवांसमोर निदान पावसाळा येईपर्यंत तरी मेंढ्यांचे पालनपोषण करण्याचा मोठा प्रश्न आहे. गावोगावी कोरोनाच्या भयानक साथीमुळे वेगवेगळ्या गावी भटकंती करून मेंढ्या जगविणारा मेंढपाळ समाज सध्या स्वत:च्या गावशिवारातच बंदिस्त झाला आहे. त्यामुळे मेंढ्यांचे पोषण कसे होईल, ही चिंता त्यांना भेडसावत आहे.

दर वर्षी गावोगावी भटकंती करून मेंढ्यांचे पालनपोषण करणाऱ्या समाजापुढे यंदा कोरोना महामारीमुळे भटकंतीचा प्रश्न उभा राहिला आहे. गावोगावी गावबंदी झाल्याने तसेच असलेल्या कोरोना रुग्णांमुळे मेंढपाळ बांधवांचे वाडे (तळ) सध्या स्वत:च्या गावशिवारापुरतेच मर्यादित झाले आहेत.



