खान्देशच नववर्ष आखाजी!
खान्देशच नववर्ष आखाजी! मराठी ग्रामीण भाषेत अखिती म्हणतात. गुजराथी भाषेत आखत्री म्हणतात आणि आपण आखाजी म्हणतो - लेखक बापू हटकर
खान्देशच नववर्ष आखाजी
आखाजी म्हणजेच अक्षय तृतीया. अक्षय म्हणजे नष्ट न होणार असत ते. या दिवशी आपण जे करतो ते नष्ट होत नाही तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया. आखाजी या अहिराणी शब्दाचा अर्थ सुद्धा अक्षयतृतीया आसाज आहे. हा हिंदूंच्या साडेतीन मुहूर्ता पैकी एक आहे.
आखाजी! बोली भाषेत क्ष शब्दाच्या जागी बोलायला सोपा म्हणून ख वापरतात.
क्षीर-खीर, द्राक्ष-दराखा, क्षार-खार, क्ष हा उच्चारायला अवघड आहे म्हणून त्या जागी ख वापरतात. जसा ज्ञ चा उच्चार हिंदी किंवा इतर लोक भाषेत ग्य करतात. त्याचा उच्चार सोपा आहे. तसाच अक्षय तृतीयेतील क्ष चा उच्चार ख झाला आहे. याला वेगळा खान्देशी असा काही अर्थ नाही. ईतर प्रदेशातही असाच उच्चार करतात.
मराठी ग्रामीण भाषेत अखिती म्हणतात. गुजराथी भाषेत आखत्री म्हणतात आणि आपण आखाजी या तीनही शब्दांचा अर्थ अक्षय तृतीयाच आहे. अक्षय तृतीया चा ग्रामीण भाषेतील शब्द आ खय तीज याचा अपभ्रंश मराठीत आखीती आहे आणि अहिराणीत तो, आखाजी असा आहे.
आखाजी हा सण खान्देशात सर्व सणांचा राजा आहे. आमच्याकडे हा सण सर्वात मोठा सण आहे. एका लेखात सर्व सांगणं शक्य नाही. पण थोडक्यात ओळख करून देतो. खान्देशात आखाजी हा सण चैत्र गौरी म्हणजे चैत्र शुद्ध तृतीयेला सुरू होतो. या दिवशी गवराई खान्देशात माहेर येते. कोणी चैत्री गौरीला गौराई बसवतात, कोणी सप्त शुंगीच्या यात्रेला म्हणजे चैत्र पुनवेला गवराई बसतात ती अक्षय तृतीय पर्यंत राहाते. वैशाख द्वितीयेला शंकर जावई पाहुणा येतो. द्वितीया तृतीयेला पाहुणचार खातो आणि चतुर्थीला गवराईला घेऊन कैलास लोकी गमण करतो. अक्षय तृतीयेला मुली माहेरी येतात. गौराई सोबत गाणी, खेळ, झोपाळा खेळतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी कायम स्वरूपी ठरलेले दोन गावाच्या शिवेवर मुली जमून जोरदार झगडा करतात. म्हणजे गाण्यातून थट्टा मस्करी करतात. टिपरी खेळतात हा एक भाग झाला.

आखाजी हा खान्देशातील नव वर्षांचा पहिला दिवस असतो. त्रेता युगाची सुरवात याच दिवशी झाली होती. त्या काळात आखाजी ते आखाजी अशी वर्ष गणना करत असत. तीच वर्ष गणना खान्देशात आहे. याचा अर्थ त्रेता युगातही खान्देश होता. त्याला त्या काळात ऋषक किंवा ऋषीदेश नाव होतं. विष्णूचा 6 वा अवतार परशुराम याचा जन्म दिवस आखाजी आहे.
खान्देशात आजच्या दिवशी जल पूजा करतात. म्हणजे कोरी मातीची तांब्र रंगांची घागर किंवा तांब्याची घागर घेऊन त्यात जळ म्हणजे पाण्याची पूजा करतात. जे अक्षय पात्रात कायम राहावे ही अपेक्षा. पाण्याची चणचण कधीच भासू नये हा जल पूजेचा हेतू असतो. खान्देशात पितृपक्षा शिवाय मकर संक्रातीला आणि अक्षय तृतीयेलाही पितृ श्राद्ध करतात.
वर सांगितल्या प्रमाणे खान्देशात याच दिवसापासून नवीन साल सुरू होत असल्याने, साल गडी त्यांचा मालका कडे एका वर्षांचा करार याच दिवशी होतो. खान्देशात बलुतेदाराना गव्हाईदार म्हणतात. न्हावी, सोनार, शिंपी, सुतार, लोहार, चर्मकार, मोटकरी, यसकर वगैरे यांचं सालही याच दिवशी सुरू होत असे. आता यातील बरेच व्यवसाय मोडीत निघाले किंवा रोखीने सुरू झाले आहेत. ते पूर्वी बलुतेदारीत होत असत.
या दिवसात झुगारी लोकांची ही चंगळ असते. या दिवसात गावे गाव पत्यांचे अड्डे सुरू होतात. घरी, शेवया, सांजोऱ्या, पुरण पोळी, आमरस, भजी, कुरडई असा बेत असतो. इतरत्र दिवाळीत जी खाण्यापिण्याची चंगळ असते ती खान्देशात आखाजीला असते. आखाजी हा खवय्यांचाही मोठा सण आहे. तिथं म्हणच आहे,
दिवाई हावरी नी आखाजी खावरी।
दिवाळीत खरिपाची पीक तयार झालेली असतात. त्यामुळे लोक हावरटा सारखे आचरवचर खात शेतावर निघून जातात. पण आखाजीच तस नाही. शेतातील पीक संपलेली असतात. स्त्रियाची घर काम, कुरडया, पापड, सांडगे, मसाले तयार करून त्याही निश्चित असतात. मग सर्व मिळून मेजवणीची मौज घेत असतात.


