अहमदनगरचं नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करा ; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्राद्वारे मागणी..
झूम मराठी वृत्तसेवा
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून औरंगाबाद शहराचा नामांतराचा वाद सुरु आहे. अशातच आता अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर करा, अशी मागणी केली आहे. तसेच मागणी करताना त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. तुम्ही काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाही, हे दाखवून द्या, असंही पडळकर म्हणाले.
हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे 'अहमदनगर' नाव बदलून 'अहिल्यादेवी नगर' करण्यात यावे.नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल.जय अहिल्या,जय मल्हार…@CMOMaharashtra pic.twitter.com/51xIYlvp5U
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) June 2, 2022
आमदार गोपीचंद पडळकर यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, नुकत्याच पार पडलेल्या चौंडी, अहमदनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा-पुतण्याच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं. शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॅामब्लास्टचा सुत्रधार दाऊद इब्राहीमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरदचंद्र पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॅान्च करण्याचा इव्हेंट वाटतो, असंही पडळकरांनी म्हटलं आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेंव्हा हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत हिंदूसंस्कृती,मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस अहिल्यामातेनं या हिंदुसंस्कृतीत प्राण फुकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे, असं पडळकरांनी पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे आपण आता कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार आहात? मुघलशाही की होळकरशाहीचा? ‘अहिल्यानगर’ नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल ही अपेक्षा, अन्यथा हा बहुजन जागा झालाय आणि संघटीत झालाय, हे लक्षात ठेवा, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री या पत्रावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाच असणार आहे.


