अमळनेरात क्षुल्लक कारणावरून, चाकूहल्ला करीत हवेत गोळीबार!
फिर्यादीवरून ९ जणांविरुद्ध दंगल व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल व शस्र कायद्यान्वये गुन्हा दाखल
अमळनेर येथे क्षुल्लक कारणावरून भांडण होऊन हाणामारी झाली. हाणामारीत एकाने दहशत माजविण्यासाठी दोघांवर चाकूहल्ला करीत हवेत गोळीबार केल्याने परिसरात मोठी भीती निर्माण झाली आहे. चाकूहल्ला आणि गोळीबारची घटना दि.२२ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास शिरूड नाका परिसरातील कन्हैया चौकात घडली.
दिपक गणेश पाटील याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, ते बाहेरून आल्यानंतर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बोर्डाजवळ चबुतऱ्यावर कुणीतरी थुंकलेले दिसले. म्हणून त्याने तेथे असलेल्या शुभम शेटे व मनोज बिऱ्हाडे यांना याबाबत विचारले. त्याचा राग आल्याने मनोजने हुज्जत घालत करून कुणाला तरी फोन लावले. त्यानंतर अरविंद बिऱ्हाडे, राकेश बिऱ्हाडे, गौतम मंगल बिऱ्हाडे, विशाल सोनवणे व इतर चार ते पाच जण आले. या वेळी गौतमच्या हातात चाकू होता. त्याने तू माझ्या भावाशी का वाद घातला, असे विचारून मनोजने चाकू काढला व मानेवर मारण्याचा प्रयत्न केला. दीपक याने तो डाव्या हातावर घेतला. त्यानंतर दीपक जीव वाचवण्याकरता पळू लागला. या वेळी विशाल, अरविंद, शुभम यांनी त्यास धरून ठेवले व मनोज आणि गौतम यांनी चाकूने दीपकच्या पाठीवर वार केला. तेव्हा दीपकचा मित्र चेतन, संजय पाटील, पवन बडगुजर, अशोक पाटील हे मदतीसाठी धावून आले. याच वेळी गौतमचा वार चेतनच्या उजव्या हातावर लागला. त्यात त्यालाही गंभीर दुखापत झाली. त्याचवेळी दहशतीसाठी हवेत गोळीबार करण्यात आला. तेव्हा गल्लीतील लोक पळू लागले होते. या प्रकरणी दीपकच्या फिर्यादीवरून ९ जणांविरुद्ध दंगल व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल व शस्र कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला



