भडगावात अंमली पदार्थाचा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, महिलेसह दोघांना अटक

भडगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत कारमधून अमली पदार्थ जप्त केले असून महिलेसह दोघांना ताब्यात घेतले आहे. तालुक्यात प्रथमच अशा प्रकारे अमली पदार्थ तस्करी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे असून दोघांना यांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी योगेश हरी चौधरी (३५) व सरगम योगेश चौधरी (३४, दोघे रा. आझाद चौक, पारोळा, सध्या मेगासिटी परिसर, भडगाव) यांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थाची खातरजमा करण्यासाठी जळगाव येथून फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले होते.
पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २२ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता पारोळा येथून भडगावकडे येणाऱ्या कार (एमएच ०१ बीबी २२१६) मधून अमली पदार्थ वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी जुन्या पारोळा रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचून संबंधित कार अडवली. यावेळी कारची तपासणी केली असता त्यामध्ये अमली पदार्थ आढळून आले. दोन्ही आरोपींविरुद्ध भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, तालुक्यात प्रथमच अमली पदार्थाची तस्करी उघडकीस आल्याने पोलिसांनी तपासाची दिशा विस्तृत केली आहे.
- पोलिसांनी केला २ लाख ६ हजारांचा ऐवज जप्त..
तपासणीदरम्यान कारमध्ये एमडी (मेफेड्रोन) या प्रतिबंधित अमली पदार्थाच्या १० पुड्या आढळून आल्या. या पुड्यांचे एकूण वजन सुमारे १४ ग्रॅम ३५० मिली असून अंदाजे किंमत ४० हजार रुपये आहे-याशिवाय १६ हजार २०० रुपयांची रोकड आणि सुमारे ५ लाख ५० हजार रुपये किमतीची कार असा एकूण २ लाख ६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



