चाळीसगाव | डॉक्टर आणि पोलिसांच्या संगनमताने रचलेला धक्कादायक कट उघडकीस

- झूम मराठी ऑनलाईन
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि चित्रपटातील कथेलाही लाजवेल असा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. येथील दहिवद फाटा परिसरामध्ये एका दुचाकीस्वाराच्या खोट्या अपघाताचा कट रचून श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी कडून तब्बल ५० लाख रुपये लाटण्याचा मोठा प्रयत्न उघडकीस आला आहे. या संपूर्ण गैरप्रकारात केवळ मृताचे कुटुंबीयच नव्हे, तर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय मधील वैद्यकीय अधिकारी आणि मेहुनबारे पोलिस ठाणे तसेच चाळीसगाव मधील पोलिसांचाही थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विमा अधिकाऱ्याने दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा सर्व बनाव उघड झाला.
सविस्तर माहितीनुसार, अरुणा जाधव यांनी आपले पती राजेंद्र शालिंदर जाधव यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा खोटा दावा करत ५० लाखांच्या विम्याची मागणी केली होती. त्यांनी कंपनीला दिलेल्या माहितीत म्हटले होते की, १९ एप्रिल २०२५ रोजी रात्री दहिवद वरून मालेगावकडे प्रवास करत असताना त्यांच्या दुचाकीला एका काळ्या रंगाच्या थार गाडीने जोरदार धडक दिली. या कथित अपघातात गंभीर जखमी होऊन राजेंद्र शालिंदर जाधव यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आश्चर्याची बाब म्हणजे, कोणताही मृतदेह समोर नसताना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांनी खोटा प्राथमिक आणि शवविच्छेदन अहवाल तयार केला. तसेच या प्रकरणी मेहुनबारे पोलिस ठाणे येथे ८६/२०२५ असा रीतसर एफआयआर देखील नोंदवण्यात आला.
परंतु, विमा कंपनीने या दाव्याची सखोल चौकशी केली असता अनेक धक्कादायक विसंगती आढळून आल्या. तपासाअंती हे सत्य बाहेर आले की, राजेंद्र शालिंदर जाधव यांचा कोणताही अपघात झाला नव्हता. त्यांचा मृत्यू या घटनेच्या खूप आधी म्हणजेच २३ फेब्रुवारी २०२४ रोजी यकृताच्या गंभीर आजाराने झाला होता. त्यांच्या घरात लावलेल्या फोटोवरही मृत्यूची हीच खरी तारीख आढळली. धक्कादायक म्हणजे माहिती अधिकारातून ग्रामपंचायतीच्या मृत्यू नोंदणीत त्यांची नोंदच नसल्याचे स्पष्ट झाले. मृताच्या नावे वेगवेगळ्या पत्त्यांवरून इतर सुमारे १० विमा कंपन्यांकडून पॉलिसी काढण्यात आल्या होत्या. या सर्व कंपन्यांकडून मिळून तब्बल साडेसात कोटी रुपये हडपण्याचा हा भयंकर मोठा घोटाळा होता.
या अत्यंत गंभीर प्रकरणी आता एकूण ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींमध्ये मृताची पत्नी अरुणा राजेंद्र जाधव, संभाजी जाधव, थार वाहनाचा मालक आणि चालक, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय येथील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर, तसेच मेहुनबारे पोलिस ठाणे आणि चाळीसगाव पोलीस दलातील कर्मचारी महेंद्र पाटील, सुनील निकम, रवींद्र बत्तीसे, सचिन निकम, विमा एजंट प्रवीण पाटील, प्रेम पाटील व मृताचा भाऊ मिथुन जाधव यांचा समावेश आहे. या सर्वांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पत्रकाराचे मत-
पैशांच्या अतीव लालसेपोटी व्यवस्थेतील रक्षकच जेव्हा गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालतात, तेव्हा समाजाचा प्रशासनावरील विश्वास उडतो. डॉक्टर आणि पोलिसांसारख्या अत्यंत जबाबदार पदावरील अधिकाऱ्यांनी अशा फसवणुकीत सामील होणे ही अतिशय गंभीर आणि चिंतेची बाब असून या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा मिळायला हवी.



