महाराष्ट्र

आज महामानव जोतीराव फुले यांचा जयंती दिवस. 

 किती काम, किती कष्ट, किती दगदग !!! बरं, त्यात स्वार्थ काय ? तर काहीच नाही. सारी धडपड समाजासाठी

जोतीराव हे सगळं का करु शकले, तर जे मनाला खटकलं, ते त्यांनी तेव्हाच्या वर्तमानातच बोलून दाखवलं. त्याला कडाडून विरोध केला. टीकाटिप्पणी, शिवीगाळ झेलली. सुधारणा भाषणांपुरती मर्यादित न ठेवता, ती प्रत्यक्षात अवतरवली. चांगल्या भविष्यासाठी वर्तमानाशी विसंगत भुमिका घेऊन जगायला मोठं धाडस लागतं. आपण बघतो की क्रांतीच्या खूप मोठ्या बाता मारणारे लोक त्यांच्या घराशेजारची गुंडगिरी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, गैरप्रकार, कायद्याचं उल्लंघन, प्रशासकीय मनमानी याविरोधात तोंडही उघडत नाही. फुले-आंबेडकरांचा वारसा सांगणारे शेकडो कार्यकर्ते असतात, पण स्थानिक समस्या, अव्यवस्था, सुविधांचा अभाव याबाबत मूग गिळून असतात. तीच गत फ्लैटमध्ये राहणाऱ्या तथाकथित विचारवंतांची असते. अवघ्या ५०-१०० लोकसंख्येच्या सोसायटीतही कधीही आवाज न उठवणारे हे लोक भाषणांतून मात्र क्रांतीच्या तुताऱ्या फुंकत असतात. 

घराशेजारच्या मनपा शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधा तरी आहेत का, याची साधी चौकशीही न करणाऱ्या लोकांना वर्षातून एकदा शिक्षकदिनाची मागणी करायला जोर येतो. 

प्रश्न शिक्षणाचा असो, स्त्रियांच्या अधिकारांचा असो, विधवा पुनर्वसनाचा की अंधश्रध्देविरोधात कठोर प्रहार असोत, जोतीराव फुलें नेहमीच काळाच्या दोन पावले पुढे चाललेले आहेत.

फुले आंबेडकरी विचार हा स्त्री सक्षमीकरणाचा, स्त्रीसन्मानाचा विचार आहे. या महामानवांकडे एक निरोगी पुरुषभान होतं, म्हणूनच या विचारांत स्त्रीचळवळीची बीजं रुजलेली आपल्याला दिसतात. आपण जर या महामानवांचे स्वत:ला पाईक म्हणवत असू, तर त्यांच्या विचारांची कास प्रत्यक्षात धरणं आवश्यक आहे.

संविधानिक विचारांचा वारसा मिरवायचा आणि जयंत्यांचे फलक बेकायदेशीरपणे लावायचे किंवा वेळकाळाचं बंधन न पाळता ध्वनीप्रदुषणाला कारणीभूत डीजेचा ढणढणाट करायचा…असलं स्वत:शीच विसंगत वागणं नाकारता येईल का?

मर्द, मर्दुमकी, हिजडे, बायल्या, बांगड्या भरा असे व तत्सम शब्दप्रयोग पुरुषवर्चस्वाचा पुरस्कार करणारे आहेत. ते हेतूत: टाळले पाहिजेत. आणि सर्वात महत्वाचं समाजात निलाजरेपणाने दिल्या जाणाऱ्या शिव्या. या शिव्या आयाबहिणींवरुन दिल्या जातात. याचाच अर्थ त्या स्त्रीवाचक म्हणजेच स्त्रीयांना अवमानित करणाऱ्या आहेत. फुले-आंबेडकरी विचारांत शिव्यांना स्थान असता कामा नये, किंबहुना शिव्यांना प्रखर विरोध व्हायला हवा. 

कोणत्याही परिस्थितीत, कितीही संतापजनक अवस्थेत कळतनकळत कोणाच्याही आयाबहिणींचा शिवराळ अवमान होणार नाही, याचा संयम म्हणजेच फुले-आंबेडकरी विचार आहे..

चला, जोतीराव फुलेंच्या, बाबासाहेबांच्या यंदाच्या जयंतीदिनी यापुढे कधीही चुकूनही शिव्या न देण्याचा निर्धार करुया. शिव्या द्यायच्या नाहीतच, सहनही करायच्या नाहीत..

लेखन – राज असरोंडकर (कायद्याने वागा लोकचळवळ)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे