ग्रहणांचा गर्भावर परिणाम होतो हे खरे काय ?
ग्रहणकालात गरोदर बाईने भाजी अगर इतर पदार्थ चिरला, तर गर्भाचा ओठ चिरला जातो. एखादी वस्तू गर्भार बाईने मोडली (ग्रहणकालात) तर गर्भाचा अवयव मोडतो, इत्यादी समजुती आपल्याकडे प्रचलित आहेत. भारतात असल्या कल्पित अवास्तव कथांचे पीक उदंड आहे. ग्रहण ही दैवी घटना आहे. चंद्रग्रहणाचे वेळी केतू चंद्राला गिळतो,वगैरे.
ग्रहण ही दैवी घटना नाही. खगोलशास्त्र व प्रकाशशास्त्र यांच्या अभ्यासातून ग्रहणांची कारणे वैज्ञानिकांना माहित झाली आहेत. पृथ्वी, चंद्र व सूर्य एका सरळ रेषेत आल्यावर ग्रहणे घडतात. सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्यास पृथ्वीच्या काही भागावर चंद्राची सावली पडते. त्या भागातील लोकांना सूर्य दिसत नाही, यास सूर्यग्रहण म्हणतात. सूर्य व चंद्राच्या मध्ये पृथ्वी आली, की पृथ्वीच्या सावलीत चंद्र येतो, अशा वेळी चंद्रग्रहण होते. नेहमीपेक्षा वेगळ्या वाटणाऱ्या व ज्याचा उलगडा होत नाही अशा घटनांना दैवी शक्ती चिकटवण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून चालत आला आहे. विज्ञानाचा एवढा प्रसार होऊनही असे मानणारे लोक आपल्या देशात उदंड आहेत. ग्रहणकाळात गरोदर बाईने नेहमीची कामे करायला हरकत नाही. ग्रहणकाळात अन्न व पाणी दूषित होते असे मानणे हास्यास्पद आहे. घरात ठेवलेल्या घागरीतील पाणी दूषित होते, मग नदीचे पाणी शुद्ध कसे राहते? ते तर अधिक दूषित झाले पाहिजे. अशा दूषित पाण्यात अंघोळ करून ग्रहणकाळात अशुद्ध झालेले शरीर कसे शुद्ध होते? आल्डस हक्सले हा प्रख्यात आंग्ल लेखक भारतात आला असताना कुंभमेळ्याच्या ठिकाणी त्याला काय दिसले? चिखलाने, गाळाने अस्वच्छ झालेल्या गंगेत हजारो लोक अंघोळ करीत होते. रोगी लोकांची त्यात भर. हे किळसवाणे दृश्य पाहून हक्सले म्हणाला, “मी लक्षाधीशाचा मुलगा असतो तर हिन्दुस्थानातील माणसांना निरीश्वरवादी बनविण्यात मी आयुष्य घालवले असते.” एकविसाव्या शतकाकडे निघालेल्या भारतात कुंभमेळ्याची गर्दी कमी होणार काय?
डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या ‘अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ या पुस्तकातून साभार.



