पाच्छापूर फाटा ते दर्यागाव या रस्त्यासाठी आंदोलन करण्यास नागरिकांचा एल्गार…
सुधागड (पाली-राहुल महाडिक) छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमितील असणारा व सुधागड तालुका ज्या नावाने ओळखला जातो त्या सुधागड किल्याकडे जाणारा म्हणजे पाच्छापूर फाटा ते दर्यागाव हा रस्ता प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेमधुन २३ जुन २०१० रोजी पूर्ण झाला. त्या नंतर ५ वर्षांनी एकदा डागडुजी करण्याचे काम झाले. परंतु ४० लाख खर्च करून दुरूस्ती केलेला रस्ता ४० दिवस देखील टिकला नाही. आजची परिस्थिती पाहता त्या रस्त्यावर चालणे देखील शक्य नाही. रस्त्याची अशी दयनिय अवस्था असताना संबंधीत अधिकारी आणि प्रशासन ग्रामस्थांच्या रस्ता पुर्ननिर्माणाच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे . गेली २ वर्ष पाठपुरावा करून देखील या रस्त्याच्या पुर्ननिर्माणा बाबतीत कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. सदर रस्त्याचा वापर ९ गाव आणि वाड्यांतील नागरीक , विद्यार्थी , शिक्षक , रूग्ण , नोकरी धंदा करणारे , मोलमजुरी करून पोट भरणारे दुग्ध व्यवसाय करणारे त्याच बरोबर सुधागड किल्ल्यावर येणारे पर्यटक , गडप्रेमी , शिवप्रेमी देखील याच रस्त्यावरून जीव धोक्यात घालुन प्रवास करत आहेत.अनेकांचे छोटे मोठे अपघात झाले आहेत व काही अपघात होता होता वाचले आहेत . स्त्याच्या पुर्ननिर्माणाचे काम शासनाने तातडीने हाती घेतले पाहीजे . परंतु प्रशासन जागे व्हायला तयार नाही . या विभागाकडून त्या विभगाकडे जबाबदारी ढकलण्याचे काम चालु आहे . या झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आम्ही ९ गावातील नागरीक आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत त्यासाठी दिनांक ०८ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता पाच्छापूर येथे श्री सोमजाई मातेच्या मंदिरात या रस्त्याचा वापर करणा – या ९ गावांतील ग्रामस्थांची बैठक आयोजित केली आहे . तरी सर्व नागरिक तसेच पत्रकार मित्रांना कळकळीची विनंती आपण या बैठकीस उपस्थित राहुन सहकार्य करावे .


